अमेरिकेने लादलेल्या टेरीफ युद्धाबाबत युरोपातील देशांनी नेभळट भूमिका घेतली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेला ताठ कणा जगातील विश्लेषकांना भुरळ पाडतो आहे. उद्योजक आणि आर्थिक विश्लेषक अरनॉड बरट्रांड यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसारखे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर बसून मार्गदर्शन घेणाऱ्या युरोपातील नेत्यांची खरडपट्टी काढलेली आहे. मोदींकडून शिका असा सल्ला त्यांना दिला आहे. चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांनाही ते भेटले. या भेटीबाबत नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेली पोस्ट रिपोस्ट करून बरट्रांड यांनी आपले सडेतोड मत व्यक्त केलेले आहे. नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतूक केले आहे. जगभरात मोठी भूराजकीय उलथापालथ होते आहे. भारताकडे जगाचे लक्ष आहे. मोदींनी घेतलेल्या भूमिकेचे कौतूक होते आहे. बरट्रांड हे फ्रेंच उद्योजक आहेत. त्यांची हाऊस ट्रीप नावाची कंपनी ट्रीप एडवायजर या ब्रॅंडने विकत घेतली. एक फ्रेंच म्हणून आपले नेते ट्रम्प यांचे बटीक असल्यासारखे वागतात, याचा राग त्यांनी या पोस्ट द्वारे व्यक्त केला आहे. ही युरोपातील सर्वसामान्यांची भावना आहे. आपल्या देशातील साधनसामुग्री आणि कर रुपाने आपण भरत असलेला पैसा अमेरिकी अध्यक्षांना खूष करण्यासाठी खर्च केला जातो आहे, याची सगळ्यांनाच चीड आहे. बरट्रांड यांच्यासारखे मोजके लोक ती व्यक्त करतायत, एवढाच फरक.



