रशिया-युक्रेन युद्धाला पूर्ण विराम देण्यासाठी युरोपिय नेत्यांच्या वरातीसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलादीमीर झेलेन्स्की अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारात रुजू झाले. या तमाम नेत्यांना मार्गदर्शन करत असताना ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांना फोन केला आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले. याच पुतीन महाशयांनी अलास्का येथे ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर पहीला फोन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला होता. या सगळ्या घटनाक्रमाचे दोन अर्थ काढता येतील. सध्याच्या भूराजकीय घडामोडींमध्ये मोदींना बाजूला ठेवून कोणालाच पुढे सरकता येणार नाही. तेच बॉस आहेत. दुसरा अर्थ ट्रम्प हे चेंबरलेन होण्याच्या मार्गावर आहेत. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीत यावेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांचा अपमान केला नाही. त्याची दोन कारणे. एक तर झेलेन्स्की कोट घालून आले होते. दुसरे त्यांच्या पत्नीने ट्रम्प यांच्या पत्नी मेलोनी यांची प्रशंसा करणारे पत्र बैठकीच्या सुरूवातीलाच ट्रम्प यांना दिले. त्यामुळे ट्रम्प सुखावले होते. जी काही चर्चा झाली त्यात रशियाने जिंकलेला युक्रेनचा पूर्व भाग, काही वर्षांपूर्वी रशियाने कब्जा घेतलेला क्रिमिया या शिवाय डोनेट्स्क, लुहान्स्क, खेरसन आणि झोपोरीजझिया या भागावर पुतीन यांना नियंत्रण हवे आहे. या भूभागावरील रशियाची मालकीवर युरोपिय राष्ट्र आणि अमेरिकेचे शिक्कामोर्तब हवे आहे.



