किती ही हाणामारी असो, कितीही संघर्ष असो, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक दरवाजा खुला ठेवावा लागतो. अमेरिकेशी संबंध ताणले गेले असतानाही भारताने तेच केलेले आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रि, प्रशासनातील अधिकारी भारताच्या विरोधात अत्यंत शेलकी विधाने करीत आहेत. तरीही भारताने मात्र संयम बाळगलेला आहे. एकाही भारतीय नेत्याने वावगे विधान केलेले नाही. चीनमध्ये झालेल्या एससीओ बैठकी दरम्यानही अपेक्षित असलेल्या काही गोष्टी भारताने कटाक्षाने टाळल्या. टेरीफ नीतीवरून ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत कडवट टीका होत असताना, ‘अजून काही बिघडलेले नाही, सगळे काही संपलेले नाही’, असे संकेत देणारे एक ताजे विधान भारताच्या बाजूने समोर आलेले आहे. जपानने शरणागती पत्करली, त्या दिवशी दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाली. २ सप्टेंबर १९४५ हा तो दिवस. या घटनेला ८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चीनमध्ये भव्य व्हीक्ट्री डे परेडचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेच्या टेरीफ नीतीमुळे, त्यांच्या अहंकारी राजकारणामुळे दुखावलेले बहुतेक समदु:खी देश या परेडमध्ये उपस्थित होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन, उत्तर कोरीयाचे किम-जोंग, इराणचे मसूद पजशिकीयान यांच्यासह २६ देशांचे प्रमुख या परेडमध्ये सहभागी झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या परेडचे निमंत्रण असूनही त्यांना या परेडमध्ये उपस्थिती टाळली.



