पाकिस्तानने इस्लामिक ‘उम्मा’चा कार्यक्रम करून टाकलाय. उम्मा म्हणजे मुस्लीमांमध्ये असलेला भाईचारा. आपसांतील बंधुभाव व्यक्त करण्यासाठी हा शब्द इस्लामिक देश घाऊक प्रमाणात वापरत असतात. पाकिस्तान नेहमीच ‘इस्लामिक उम्मा’च्या बाता मारत असतो. इस्त्रायल- इराणमध्ये जोरदार जुंपलेली असताना या शब्दाचा पोकळपणा समोर आलेला आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स’ चे जनरल मोहमद रेजाई यांनी केलेल्या विधानामुळे पाकिस्तानचे पुरते वस्त्रहरण झालेले आहे. ‘इस्त्रायलने इराणच्या विरोधात अणुबॉम्बचा वापर केला तर पाकिस्तान इस्त्रायलवर अण्वस्त्रांनी हल्ला करेल’, असे आश्वासन आम्हाला पाकिस्तानकडून मिळाले असल्याचे ते म्हणाले होते. त्यांचा हा आशावाद फुसका होता, हे उघड होण्यासाठी फार वेळ लागला नाही. इस्त्रायलने इराण संघर्ष झालाच तर पाकिस्तानची भूमिका काय असेल? अशी चर्चा अवघ्या जगात होती. हा संघर्ष नेमका कधी होणार? हे जगात फक्त अमेरिका आणि इस्त्रायल दोन देशांना माहित होते. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेने पाकिस्तानची तळी उचलायला का सुरूवात केली? नूरखान हवाई तळावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेला कळा का आल्या? अमेरिकेच्या सेण्ट्रल कमांडचे जनरल मायकल कुरीला यांना पाकिस्तान हा दहशतवाद विरोधी लढ्यातील महत्वाचा भागीदार आहे, याची अचानक आठवण का आली? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर एकच अमेरिकेला इराणचा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी त्यांना पाकिस्तानला वापरायचे होते.



