चीनचे परराष्ट्र मंत्री सन वुईडोंग हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याशी त्यांची चर्चा झाली. परस्पर हितांच्या मुद्द्यावर दोन्ही देशांनी सहमतीने काही निर्णय घेतले. पाच वर्षांपूर्वी भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आज दोन्ही देशांना एकमेकांची गरज भासते आहे. हे घडावे ही रशियाची इच्छा होती. ती प्रत्यक्षात आणली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. जून २०२० मध्ये गलवान येथे भारत आणि चीनच्या फौजांमध्ये संघर्ष झाला. आपले काही जवान धारातीर्थी पडले, चीनचेही मोठे नुकसान झाले. त्यानंतर पूर्व लडाखमध्ये चीनने मोठ्या संख्येने फौज आणून उभी केली. भारतानेही चीनला कळेल या भाषेत प्रत्युत्तर दिले. चार वर्षे दोन्ही देशांच्या सेना एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या होत्या. दबाव टाकून भारत झुकत नाही, बधत नाही हे चीनच्या लक्षात आल्यानंतर अखेर गेल्या वर्षी वाटाघाटीनंतर हा पेच सुटला. डीसेंबर २०२४ मध्ये दोन्ही देशांच्या फौजा मागे हटल्या.



