इस्त्रायने कतारमध्ये दडी मारून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ला केल्यानंतर मुस्लीम देशांमध्ये खळबळ माजली. त्यानंतर दोहा येथे ६० मुस्लीम देशांची बैठक झाली. याचेच पुढचे पाऊल म्हणजे सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत केलेला संरक्षण करार. दोन्ही पैकी कोणत्याही देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल असा हा करार आहे. पाकिस्तान हा जगातील एकमेव अण्वस्त्रधारी मुस्लीम देश मानला जातो. त्यामुळे या कराराचा अण्वस्त्रांशी संबंध जोडला जातो आहे. इस्त्राएलच्या हल्ल्यानंतर आखातातील मुस्लीम देशांत किती वेगाने घडामोडी घडतायत हे लक्षात घ्या. ९ सप्टेंबर रोजी इस्त्रायलने कतारमध्ये हल्ला केला. हमासच्या दहशतवाद्यांना टीपले. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी दोहामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ मुस्लीम कण्ट्रीज या संघटनेची बैठक झाली. दोन दिवसांनी १७ सप्टेंबर रोजी सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये संरक्षण करार झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सौदीचे राजपुत्र मोहमद बिन सलमान यांनी करारावर सह्या केल्या. या करारामुळे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील सुरक्षा समीकरणांमध्ये बदलणार आहेत, अशा प्रकारचा दावा पाकिस्तानी करीत आहेत.



