चीनमध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीनंतर अमेरिका थोडी नरमल्यासारखी दिसते. प्रशासनातील लोक अजून चढ्या आवाजात दमबाजी करताना दिसले तरी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर मवाळ झाल्यासारखा दिसतो आहे. गेला बराच दोन्ही देशांमध्ये शाब्दीक हाणामारी सुरू आहे, ट्रम्प सुद्धा अनेकदा वाकड्यात शिरले, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही थेट उत्तर दिले नाही. आज मात्र ते घडले आहे. ट्रम्प यांच्या साखरपेरणीला मोदींनी गोड उत्तर दिले आहे. अर्थात हे सगळे घडण्याची कारणे वेगळीच आहेत. सगळ्या जगात वादळ निर्माण केल्यानंतर ट्रम्प थोडे थंड झालेले दिसतात. किमान भारताच्या बाबतीत तरी मोदी हे मित्र असल्याची, ते ग्रेट प्रायमिनिस्टर असल्याची त्यांना पुन्हा आठवण झाली आहे. अमेरिकेचे भारतासोबत विशेष संबंध आहेत, चिंता करण्याचे काहीच कारण नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली आहे. काल ट्रुथ सोशलवर त्यांनी एक पोस्ट टाकली होती. त्यात नरेंद्र मोदी, ब्लादमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांचे फोटो होते. असे वाटते की आपण भारत आणि रशिया चीनच्या अंधाराजगात हरवले आहेत. त्यांना प्रदीर्घ आणि सुमृद्ध वाटचालीसाठी शुभेच्छा. असशी पोस्ट केली होती. प्रियकर गमावलेल्या प्रेयसीने उसासे टाकावेत तशी ही पोस्ट होती. याच पोस्टबाबत त्यांना एका भारतीय पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पलटी मारली आणि सांगितले की भारतासोबत आमचे विशेष संबंध आहेत. मोदींबाबतही ते गोडगोड बोलले.



