देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १०३ मिनिटांचे भाषण झाले. सेमी-कण्डक्टर पासून शेतकरी हितांच्या रक्षणापर्यंत मोदी सविस्तर बोलले. परंतु यावर चर्चा न करता मराठी मीडिया उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार यावर चर्चा करत होते. जणू हे दोघे २००६ पर्यंत एकत्र असताना महाराष्ट्र अगदी चंद्रावर नेऊन ठेवण्याच्या तयारीत होते. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांनी नवा पक्ष काढल्यामुळे ते राहून गेले. एकत्र आलेल्या या दोघांना पतपेढीची क्षुल्लक निवडणूकही जिंकता आली नाही. पराभवामुळे सगळ्यात जास्त शोककळा ठाकरे ब्रॅंडचा गाजावाजा कऱणाऱ्या मराठी वृत्तवाहीन्यांवर शोककळा पसरली आहे. आपणच निर्माण केलेल्या या कथित ब्रॅंडचा कडेलोटही त्यांनीच करून टाकला. मुंबईतील ‘बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उबाठा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या उत्कर्ष पॅनेलला खाते सुद्धा उघडता आले नाही. मनसेला एकवेळ बाजूला ठेवू, परंतु बेस्ट आणि महापालिकेवर ज्यांनी सुमारे २५ वर्षे सत्ता राबवली त्या उद्धव ठाकरेंसाठी हे किती लाजिरवाणे आहे. ही निवडणूक छोटी होती, क्षुल्लक होती. हे एकवेळ नाही शंभर वेळा मान्य, परंतु तुम्हाला ती छोटीशी, क्षुल्लक निवडणूकही जिंकता आली नाही ना.



