अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रोज भारताला नव्या धमक्या देत आहेत. जे बोलले ते केले, असा काही त्यांचा लौकीक नाही. परंतु समजा त्यांनी भारताला दिलेली धमकी प्रत्यक्षात आणली तर त्याचे उत्तर भारत कसे देणार? या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही, परंतु उत्तर आहे, हे मात्र नक्की. हे उत्तर भारत सरकारकडे आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे सुतोवाच केलेले आहे. त्याही पेक्षा हे उत्तर देण्याची क्षमता भारतातील किमान २३ कोटी लोकांकडे आहेच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टेरीफची घोषणा केली. ट्रम्प धमकी देतात. त्याचा फार परीणाम होताना दिसला नाही की मग धमकीची तीव्रता वाढवतात. २५ टक्के टेरीफची घोषणा करून भारत कळवळत नाही, म्हटल्यावर त्यांनी हे टेरीफ वाढवण्याची धमकी दिली. भारत या धमक्यांना भीक घालत नाही, वर आपलेच वस्त्रहरण करतोय, हे ट्रम्प यांचे दुख आहे. रशियाशी व्यापार युरोप आणि अमेरिकाही करतो. फरक एवढाच भारत जर रशियाकडून तेल विकत घेतो तर अमेरिका युरेनियम विकत घेतो. रेअर अर्थ मिनरल्स विकत घेतो. म्हणजे रशियाच्या वॉर मशिनला भारत पैसा पुरवत असेल तर युरोप आणि अमेरिका भारतापेक्षा जास्त पैसा पुरवतात. युक्रेनमध्ये मरणाऱ्या लोकांच्या शवाचे ओझ त्यांच्या खांद्यावरही आहे. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्रम्प यांच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी जरी हे शब्द वापरले नसले तरी, परंत त्यातून ध्वनीत होणारा अर्थ मात्र तोच आहे. ट्रम्प यांचे निकष भारतासाठी वेगळे आणि अमेरीकेसाठी वेगळे आहेत. इतकेच नाही, ते भारतासाठी वेगळे आणि चीन-पाकिस्तानसाठीही वेगळे आहेत.



