परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर चीनमध्ये दाखल झाले आहेत. गलवानमध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पाच वर्षांनी हा संवाद पुन्हा सुरू होतो आहे. आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनमध्ये गेले. त्यानंतर आता एस. जयशंकर चीनी नेत्यांसोबत संवाद साधत आहेत. गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांमध्ये तणाव वाढवणाऱ्या अनेक घडामोडी घडल्या. कधी चीनने बाह्या सरसावल्या. कधी आपण. चीन आपला मित्र नाही किंबहुना शत्रूच आहे, हे आपल्याला पक्के ठाऊक आहे. भारत चीनमध्ये असलेले अनेक मुद्दे असे आहेत की, भविष्यात दोन्ही देशांमध्ये युद्ध अटळ आहे. तरीही दोन्ही देश चर्चा चर्चा खेळतायत, याची काही ठोस कारणे आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य असलेल्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला एस.जयशंकर गेले आहेत. १४ आणि १५ जुलै असे दोन दिवस ही बैठक तियानजीन येथे होते आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर उपराष्ट्रपति हान झेंग आणि परराष्ट्र मंत्री वांग यी या नेत्यांना भेटणार आहेत. गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांचे लष्कर एलएसीवर उभे होते. सतत चर्चा करून यातून मार्ग काढण्यात आला. दोन्ही देशांचे सैन्य मागे हटले. संबंध सुरळीत होत असल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु हे संबंध गेल्या काही दिवसात अचानक ताणले गेले आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. जो पर्यंत प्रत्यक्ष युद्ध होत नाही, तोपर्यंत कितीही तणाव असला तरी संवाद, वाटाघाटी सुरू ठेवायच्या असे भारताचे धोरण या निमित्ताने दिसते आहे.



