मेंदूवर नियंत्रण गमावलेला माणूस जसा आज एक आणि उद्या एक अशी विधाने करतो, तशी परीस्थती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे. भारत हा महत्वपूर्ण देश आहे, अमेरिका आणि भारताचा व्यापार करार टप्प्यात आहे, असे विधान काही दिवसांपूर्वी करणाऱ्या ट्रम्प यांनी भारताचे अर्थकारण मृतवत झालेले आहे, असे अकलेचे तारे तोडलेले आहेत. भारतावर २५ टक्के आयात शुल्क आणि दंडाची घोषणा त्यांनी केली आहे. पाकिस्तानसोबत मात्र त्यांनी व्यापार करार झाल्याचे जाहीर केलेले आहे, ज्याचा तपशील उपलब्ध नाही. तेल उत्पादनाच्या क्षेत्रात पाकिस्तानसोबत भागीदारीचे सुतोवाच त्यांनी केले आहे. उद्या पाकिस्तान भारताला तेल निर्यात करू शकतो असे आचरट विधानही केले आहे. ट्रम्प यांच्या या बडबडीला थेट पाकिस्तानमधून सणसणीत चपराक मिळालेली आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडींवरून एक बाब स्पष्ट होती, की ट्रम्प यांना भारताश व्यापार करार करण्यापेक्षा, भारताचा रशियासोबत असलेला व्यापार बंद करण्यामध्ये जास्त रस होता. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल विकत घेत होता, शस्त्र विकत घेत होता. भारताने हे करू नये म्हणून अमेरिका, युरोपियन युनियन भारताला धमकावण्याचे काम करीत होते. भारताची भूमिका स्पष्ट होती. आमच्या देशाच्या ऊर्जा गरजा आहेत. आमच्या देशासाठी जे योग्य असेल ते आम्ही करू. व्यापार कराराद्वारे भारताच्या कृषी, डेअरी आणि लघु उद्योग क्षेत्रात शिरकाव करायचा, भारतीयांच्या गळ्यात मांसाहारी दूध आणि जेनेटीक बियाणी मारायची ही त्यांची भूमिका होती. ती भारताने साफ फेटाळली. देशहिताचा करार असेल तरच करणार अशी ठाम भूमिका भारताने घेतली. आम्ही ९ जुलैच्या डेडलाईनची चिंता करत नाही, असे आपले वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी ठणकावून सांगितले. ही डेडलाईन उलटून गेल्यानंतरही अमेरिकेने भारतावर टेरीफ लादले नाही, त्यामुळे काही तर सकारात्मक होईल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही.



