११ जुलै २००६ रोजी मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच्या सर्व १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. सायंकाळी ६.२४ ते ६.३५ अशा फक्त ११ मिनिटांच्या काळात माहिम, माटुंगा, वांद्रे, खार, जोगेश्वरी, बोरीवली आणि भाईंदर अशा सात ठिकाणी झालेल्या या साखळी स्फोटांमध्ये १८९ लोकांचा बळी गेला, ८०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते. अवघ्या भारताला हादरवणारी ही घटना होती. मकोका न्यायालयाने २०१५ मध्ये याप्रकरणी अटक केलेल्या १२ पैकी पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. सगळेच निर्दोष सुटले. मग ज्यांनी निर्दोष मुंबईकरांचा बळी घेतला ते सहीसलामत गायब झाले, असा काढायचा का? मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि राज्यकर्त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह लावणारी ही घटना आहे.



