राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले असून हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसासोबत गारपिटीचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या वातावरणात लक्षणीय बदल होत आहेत. वरच्या स्तरावर पश्चिमेकडून येणारे थंड वारे आणि विदर्भ ते दक्षिण कर्नाटकदरम्यान तयार झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे परिस्थिती अधिक सक्रिय झाली आहे. परिणामी, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे ओलसर वारे राज्याकडे खेचले जात आहेत. या वेगवेगळ्या वाऱ्यांच्या संगमामुळे पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे.
हे ही वाचा:
‘वन अविघ्न पार्क’ मधील जैन मंदिरातील चोरीचा उलगडा
झारखंडमध्ये ‘टायगर’चे आत्मसमर्पण!
ट्रम्प-इराण तणावाने बाजारात भूकंप; मोठ्या घसरणीनंतर पुन्हा सावरला शेअर बाजार
हनुमान जन्मोत्सवानिमित्त ‘रामायण’चा टीझर रिलीज
मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील काही दिवस शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही भागांत ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वेगवान वारेही अनुभवायला मिळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ५० किमीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होणे किंवा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा धोका अधिक असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्यामुळे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत तसेच शेतीची कामे हवामानाच्या अंदाजानुसार नियोजित करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये पावसासह गारपिटीच्या घटना घडल्या असून द्राक्ष, आंबा, केळी आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याची नोंद आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यातही हवामानातील हे बदल कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचा प्रभाव जाणवणार असून नागरिकांनी तसेच प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे. एकूणच, राज्यासह मुंबईत पुढील काही दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.







