गेल्या काही वर्षांपासून वाढत्या विकास कामांमुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्याही जास्त आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये राज्यात ५५ जणांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक ४१ मृत्यू हे वाघाच्या हल्ल्यातील आहेत. यावर्षीची आकडेवारी ही गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे. वाघाच्या हल्ल्यात सर्वात जास्त मृत्यू हे महाराष्ट्रात झाल्याचे ‘सकाळ वृत्तसेवेला’ सूत्रांमार्फत सांगण्यात आले.
वन विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे वाघासह इतर वन्यप्राण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात वाघांच्या संख्येतही विलक्षण वाढ होत असताना त्यांचा अधिवास मात्र कमी झाला आहे. वाढणारी विकासकामे, रस्ते रुंदीकरण प्रकल्प यामुळेही प्राण्यांचा आणि मानवाचा संपर्क वाढू लागला आहे.
हे ही वाचा:
…ते चार सर्वसामान्य नागरिक जात आहेत अंतराळ पर्यटनाला
‘आयपीएल’मध्ये आणखी दोन संघ मैदानात उतरणार!
मुंबईमध्ये डेंग्यूचा ‘ताप’ वाढला!
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाने लव्ह जिहादला बसणार फटका
गेल्या आठ महिन्यांत मनुष्यावर हल्ले केलेल्या दोन ते तीन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले. दोन वाघांना जेरबंद करण्यात यश आले. आता गडचिरोली जिल्ह्यात मनुष्यावर हल्ला केलेल्या वाघाला पकडण्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत. या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत, मात्र अद्यापही यश आलेले नाही.
गेल्या वर्षी राज्यात नऊ महिन्यांमध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ५३ नागरिकांनी जीव गमावले होते. यंदा आठ महिन्यांमध्येच जीव गमावलेल्या नागरिकांच्या संख्येने ५० चा आकडा ओलांडला आहे. वाघामुळे ४१, बिबट्यामुळे १०, जंगली डुकरामुळे तीन आणि हत्तीच्या हल्ल्यात एका नागरिकाने आपला जीव गमावला आहे. यामध्ये सर्वाधिक ४९ मृत्यू हे विदर्भातले आहेत. राज्यात गेल्या आठ महिन्यांत ५५ जणांचे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेले असून सर्वाधिक ४१ मृत्यू वाघाच्या हल्ल्यातील आहेत, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक युवराज यांनी दिली.