दिल्लीतील तिहार कारागृहात दहशतवादी कट प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमेरिकन नागरिक मॅथ्यू आरोन व्हॅनडाइकने न्यायालयात एक वेगळीच मागणी केली आहे. तिहार जेलमध्ये मिळणारे अन्न खूप तिखट, तेलकट आणि तळलेले असल्याने ते खाता येत नसल्याचा दावा करत त्याने ‘अमेरिकन पद्धतीचा आहार’ देण्याची किंवा स्वतःचे अन्न शिजवण्याची परवानगी मागितली आहे.
दिल्लीतील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात व्हॅनडाइकने सांगितले की, तो अमेरिकेचा नागरिक असून भारतीय तुरुंगातील नियमित आहाराची त्याला सवय नाही. तुरुंगात मिळणारे अन्न अत्यंत तिखट, तेलकट, मसालेदार आणि डीप-फ्राय असल्यामुळे त्याला ते खाता येत नाही. त्यामुळे गेल्या सुमारे ५० दिवसांपासून तो जवळपास उपोषणावर असून मुख्यतः सोया मिल्क आणि द्रव पदार्थांवरच जगत आहे. व्हॅनडाइकच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, योग्य आहार मिळत नसल्यामुळे त्याचे सुमारे १४ किलो वजन कमी झाले आहे. त्याच्या दृष्टीवरही परिणाम झाला असून शारीरिक ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे मानवतावादी दृष्टीकोनातून त्याला विशेष आहाराची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात व्हॅनडाइकने चिकन, मासे, पास्ता, ऑलिव्ह ऑइल, सोया मिल्क, ब्रेड, बटर, तांदूळ, बटाटे, कांदे, बीन्स, मसाले तसेच इतर प्रथिनयुक्त पदार्थ उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. याशिवाय इंडक्शन स्टोव्ह, भांडी आणि स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य देण्याचीही मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून तो स्वतःचे अन्न तयार करू शकेल. त्याच्या कुटुंबीयांनी या आहाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत शर्मा यांच्या न्यायालयात झाली. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) या अर्जावर स्वतंत्र उत्तर देणार नसल्याचे सांगितले, तर तिहार कारागृह प्रशासनाने आपले उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितली. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जुलै रोजी निश्चित केली आहे.
हे ही वाचा:
एनटीएनएलचा लिपिकच आढळला केबल चोर
नो नेटवर्क, नो टेन्शन! BSNL ने आणला खास सॅटेलाइट फोन
बीएचयूमध्ये झाडांची बेकायदा तोड महागात; २.६५ कोटींची भरपाई
‘फिलिप्स’च्या आरोग्यसेवा AI सोल्युशनसाठी भारताला पसंती
व्हॅनडाइकवर कोणते आरोप?
मॅथ्यू आरोन व्हॅनडाइकला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) यावर्षी मार्चमध्ये सहा युक्रेनियन नागरिकांसह अटक केली होती. तपास यंत्रणांच्या आरोपानुसार, हे सर्वजण म्यानमारमार्गे भारतात घुसले होते आणि ईशान्य भारतातील तसेच म्यानमारमधील सशस्त्र गटांना ड्रोन प्रशिक्षण, शस्त्रसामग्री आणि अन्य प्रकारची मदत पुरवत असल्याचा संशय आहे. या प्रकरणात त्याच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) आणि दहशतवादी कटाशी संबंधित विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून आरोपांची न्यायालयीन पडताळणी बाकी आहे.







