माजी मुख्यमंत्री आणि आप नेत्या आतिशी यांची रविवारी (२३ फेब्रुवारी) पक्षाच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. विरोधी पक्ष नेते म्हणून निवड होणाऱ्या आतिशी पहिल्या महिला ठरल्या आहेत. आपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते म्हणून आतिशी यांची एकमताने निवड करण्यात आली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एक मजबूत महिला चेहरा म्हणून त्यांचे नाव सुचवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह २२ आमदार या बैठकीला उपस्थित होते. अलिकडेच झालेल्या निवडणुकीत केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह ‘आप’चे वरिष्ठ नेते आपापल्या जागांवरून पराभूत झाले आहेत, त्यामुळे आतिशी यांची विरोधी पक्षनेतेपदी झालेली बढती महत्त्वपूर्ण आहे. विरोधी पक्षनेते म्हणून निवड होताच आतिशी केजरीवाल यांचे आभार मानले आणि दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे भाजपचे निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यासाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“दिल्लीच्या लोकांनी आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका सोपवली आहे आणि एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आम्ही भाजप सरकार दिल्लीच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल याची खात्री करू. ‘आप’ सभागृहात जनतेचे प्रश्न पूर्ण ताकदीने मांडेल. दिल्ली आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहील,” असे त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले. या घोषणेनंतर केजरीवाल यांनीही ट्विट केले की, “आतिशजी यांना सभागृहात आपच्या नेतेपदी निवडल्याबद्दल मी अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेच्या हितासाठी आप रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावेल.”
हे ही वाचा :
तेलंगणात शिवरायांच्या पुतळ्यावर प्लास्टिक टाकत अनावरण रोखले, पण वारा आला आणि…
‘महाकुंभ’ बद्दल वादग्रस्त बोलणाऱ्याचा मोदींनी घेतला समाचार
उत्तर प्रदेश: गुलनाज आणि सरफराजने स्वीकारला सनातन धर्म, ११ आणि ३ हजारांचा मिळाला धनादेश!