बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार २०२५ च्या बिहार निवडणुकीबाबत अॅक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी पक्षातील बंडखोर नेत्यांवर जलद आणि कठोर कारवाई सुरू केली आहे. काही तासांच्या आतच १६ बंडखोर नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
रविवारी (२६ ऑक्टोबर) नितीश कुमार यांनी पाच नेत्यांना जनता दल (युनायटेड) म्हणजेच जेडीयूमधून हकालपट्टी केली. या यादीतील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे गोपाळपूरचे आमदार गोपाल मंडल. त्याआधी शनिवारी (२५ ऑक्टोबर) नितीश कुमार यांनी “पक्षविरोधी कारवाया” केल्याच्या आरोपाखाली ११ नेत्यांना पक्षातून काढून टाकले.
रविवारी जेडीयूमधून बाहेर काढण्यात आलेल्या पाच नेत्यांमध्ये, आमदार गोपाल मंडल, माजी मंत्री हिमराज सिंह, माजी आमदार महेश्वर यादव, माजी एमएलसी संजीव श्याम सिंह आणि प्रभात किरण यांचा समावेश आहे.
गोपाल मंडल हे गोपाळपूर मतदारसंघाचे विद्यमान जेडीयू आमदार असून त्यांनी ही जागा सलग तीन वेळा जिंकली आहे. मात्र, यंदा पक्षाने त्यांना तिकीट नाकारले, ज्यामुळे ते नाराज झाले होते. दुखावलेल्या गोपाल मंडल यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. अखेर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि परिणामी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
यापूर्वी, जेडीयूने माजी मंत्री शैलेश कुमार यांच्यासह ११ जणांना पक्षातून काढून टाकले. यामध्ये माजी आमदार श्याम बहादूर सिंग (बरहडिया), सुदर्शन कुमार, माजी एमएलसी संजय प्रसाद (चकाई), रणविजय सिंग, विवेक शुक्ला, आस्मा परवीन, लव कुमार, अमर कुमार सिंग, आशा सुमन आणि दिव्यंशु भारद्वाज यांचा समावेश होता.
हे ही वाचा :
राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचत होता अदनान
नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होण्यापूर्वी श्रीराम मंदिर होईल सुसज्ज
जुलै–सप्टेंबर तिमाहीत १.४८ अब्ज डॉलर्सच्या टेक्नॉलॉजी डील्स
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा ५ नोव्हेंबर रोजी आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.







