प्रसिद्ध बॉलिवूड लेखक मनोज मुंतशीर शुक्ला हे अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे त्यांची जोरदार चर्चा होत आहे. यावेळी त्यांनी थेट छत्रपती संभाजी नगरमधील औरंगजेबाच्या कबरीवर बोट ठेवले आहे.
अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांचा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या थडग्यावरून नवा वाद सुरु झाला आहे. विविध हिंदू संघटना, भाजपाच्या नेत्यांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. यावरून मनोज मुंतशीर यांनी देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते या संपूर्ण वादावर आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. या व्हिडिओद्वारे त्यांनी सरकारला असे सुचवले आहे की, ‘औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची गरज नाही, उलट सरकारने त्यावर शौचालय बांधावे.’
गीतकार मनोज मुंतशीर शुक्ला म्हणाले “औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय लज्जेचे स्मारक आहे. त्या ठिकाणी असे काय आहे ज्याचा कोणत्याही भारतीयाला अभिमान वाटावा? जर औरंगजेबची कबर अभिमानास्पद असेल, तर आपण आपल्या देशभक्तीबद्दल पुन्हा विचार केला पाहिजे. जेव्हा आपण राम मंदिरासाठी कायदेशीर लढाई लढत होतो, तेव्हा काही लोक सल्ला देत होते की प्रभू श्री राम प्रत्येक कणा-कणात आहेत, मग मंदिर बांधण्याची गरज काय?, त्याठिकाणी रुग्णालय किंवा शाळा बांधा.
हे ही वाचा :
त्या योद्ध्याला नमन, जो शरण गेला नाही तर मृत्यू स्वीकारला!, विकी कौशलची मानवंदना
पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांना दिले महाकुंभाचे गंगाजल, मखाना आणि बनारसी साडी
काँग्रेसचे नवे टूलकिट? वक्फ विधेयक विरोधात शेतकऱ्यांप्रमाणे रस्ते अडवा!
सार्वजनिक निधीच्या गैरवापराप्रकरणी केजरीवालांवर गुन्हा दाखल करा
ते पुढे म्हणाले, अशा लोकांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार करून त्यांना सांगू इच्छितो आणि भारत सरकारकडे मागणी करतो की, औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यावर शौचालय बांधले पाहिजे. स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. देशात अधिक शौचालये बांधण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीपेक्षा चांगले ठिकाण असू शकते का?
आता औरंगजेबाच्या कबरीवरून वक्तव्य केल्यामुळे अनेकजण माझ्या विरोधात कॉमेंट करतील. ते म्हणतील, ‘कोणाच्या बापाचा थोडीना हिंदुस्थान आहे.’ तर अशा लोकांना मी सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांना आम्ही आमचे वडील समजतो त्यामुळे आमच्या बापाचाच हिंदुस्थान होता आणि आहे, असे मनोज मुंतशीर शुक्ला म्हणाले. मनोज मुंतशीरचा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. त्याच्या व्हिडिओवर अनेक युजर्स त्याला पाठिंबा देताना दिसले, तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.