छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातून नक्षलविरोधी लढ्यातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकाचवेळी तब्बल ७१ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक आत्मसमर्पणानंतर पोलिस प्रशासनाकडून या नक्षलवाद्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. नक्षलवादाच्या हिंसक मार्गाला कंटाळून त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला, असे आत्मसमर्पितांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये २१ महिला आणि ५० पुरुष आहेत.
या ७१ नक्षलवाद्यांपैकी ३० जणांवर पोलिसांनी बक्षीस जाहीर केले होते, ज्यांचे एकूण इनाम ६४ लाख रुपये होते. हे सर्वजण बस्तर विभागातील विविध भागांमध्ये सक्रिय होते आणि अनेक वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होते.गेल्या काही महिन्यांत छत्तीसगडमध्ये नक्षल चळवळीला मोठा फटका बसत आहे. अनेक वरिष्ठ नक्षल नेते चकमकीत ठार झाले आहेत, तर काहींनी संघटना सोडून आत्मसमर्पण केले आहे. परिणामी, नक्षल चळवळीचे बळ सातत्याने कमी होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. त्यानंतर पोलिस आणि सुरक्षा दलांकडून राज्यभरात व्यापक मोहीम राबवली जात असून, त्याला मोठे यश मिळत आहे.या नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून नव्या सुरुवातीसाठी पाऊल टाकले आहे. प्रशासनाकडून त्यांना पुन्हा समाजात सामावून घेण्यासाठी आवश्यक मदत आणि पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
शाल, शिल्पे आणि बरच काही: पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव सुरू!
लेहमध्ये निदर्शने चिघळली; भाजप कार्यालयावर दगडफेक, पोलिस व्हॅन पेटवली
प्रसिद्ध दिग्दर्शक आर. डी. नारायणमूर्ती यांचे निधन
कॉंग्रेसची बुडालेली नाव वाचवायचा प्रयत्न
ही घटना छत्तीसगडमधील नक्षलविरोधी लढ्याच्या दृष्टीने एक मोठा टप्पा मानली जात आहे, आणि येत्या काळात आणखी नक्षलवादी आत्मसमर्पण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







