‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना मुंबई मराठी साहित्य संघ तसेच डॉ. भालेराव आणि कुटुंबीय पुरस्कृत यंदाचा ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या ८८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात साहित्य संघाच्या अध्यक्ष अचला जोशी यांच्या हस्ते डॉ. दातार यांना दिला जाणार आहे. गिरगावमधील डॉ. अ. ना. भालेराव नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे मराठी विश्वातील विवीध क्षेत्रातील कर्तृत्ववान व यशस्वी व्यक्तींना दरवर्षी ‘मराठी यशवंत पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. रोख २५,००० रुपये, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याआधी हा पुरस्कार चित्रपट व नाट्य दिग्दर्शक विजया मेहता, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव चितळे, उद्योजक सुभाष दांडेकर, संगीतकार यशवंत देव, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर अशा नामवंतांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. दातार हे साहित्य संघाच्या यंदाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून त्यांच्या हस्ते चार साहित्य पुरस्कारांचेही वितरण होणार आहे. यावेळी डॉ. दातार बीजभाषण करणार असून ‘उद्योगक्षेत्रातील माझे अनुभव’ या विषयावर मनोगत व्यक्त करतील.
हेही वाचा..
तृणमूल पक्षाचे महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाईचे संकेत
विराट कोहलीच्या ९५ धावांनी युवराज सिंग रोमांचित
धनगर आरक्षणासाठी सांगलीतील तरुणाची आत्महत्या
कांदिवलीमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू
जिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात अनेक उद्योजक घडले आहेत. यातील काही मोजक्या उद्योजकांनी भारतातच नव्हे, तर जगातही आपल्या उद्योगाचे साम्राज्य निर्माण केले आहे. दुबईतील सुप्रसिद्ध ‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’ समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. दातार यांनी गेल्या ३९ व र्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या दातार यांनी आखाती देशांत ५० सुपर मार्केट्सची स्वत:ची रीटेल आऊटलेट्सची साखळी निर्माण केली. त्याचबरोबर पिठाच्या दोन गिरण्या आणि मसाल्याचे दोन कारखानेही उभारले. धनंजय दातार यांची कंपनी आखाती देशांतील स्थानिक व भारतीयांच्या घराघरांत पोचली आहे.