२०२४ च्या नीट (NEET) पेपर गळती प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळी झारखंडमधील रांचीच्या बरियातू परिसरात, बिहारमधील पटणा आणि नालंदा येथे अनेक ठिकाणी छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, पेपर गळती प्रकरणाचा मास्टरमाइंड बिहारचा रहिवासी संजीव मुखिया, त्याचे नातेवाईक आणि निकटवर्तीय ईडीच्या तपासाच्या रडारवर आहेत. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडीने इन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल करत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
मे २०२४ मध्ये वैद्यकीय अंडरग्रॅज्युएट कोर्ससाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) च्या नंतर पेपर गळतीचे वृत्त समोर आले. यानंतर या प्रकरणाची चौकशी प्रथम पटणा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आली. पुढे हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आले. चौकशीत संजीव मुखियाचे नाव प्रमुख सूत्रधार म्हणून समोर आले. त्याला २४-२५ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
हेही वाचा..
‘या’साठी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार द्या!
हा जॅकपॉट भारताला कुठच्या कुठे नेईल…
कुंडमळात पूल कोसळला, नागरिकांची काहीच जबाबदारी नाही?
हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, म्हणत ठाकरेंना डिवचले!
गुरुवारी ईडीने रांचीतील संजीव मुखियाचा निकटवर्तीय सिंकंदर प्रसाद यादवेंद्र आणि पटणामधील त्याचा मुलगा डॉ. शिव यांच्या ठिकाणी छापे टाकल्याची माहिती आहे. या पेपर गळती प्रकरणात सीबीआयने मागील वर्षी झारखंडमधील हजारीबाग येथून ओएसिस स्कूलचे प्राचार्य व राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) चे सिटी कोऑर्डिनेटर एहसान उल हक, उपप्राचार्य मोहम्मद इम्तियाज, एका दैनिक वृत्तपत्राचा पत्रकार जमालुद्दीन आणि एका गेस्ट हाउसचा चालक राजकुमार ऊर्फ राजू यांना अटक केली होती.
सीबीआयच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की नीट-यूजी पेपर झारखंडमधील हजारीबाग येथील ओएसिस स्कूलमधून लीक करण्यात आले होते. तेथून पेपर पटणा येथे पाठवण्यात आला, जिथे एका वसतिगृहात अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या रकमेसाठी केवळ प्रश्नपत्रिकाच दिली गेली नव्हे, तर उत्तरही पाठ करून घेतले गेले.
