भारतीय हॉकी संघाचा अनुभवी फॉरवर्ड आणि टोकियो व पॅरिस ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता खेळाडू ललित कुमार उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यानंतर हॉकी इंडियाने त्यांच्या दशकभराच्या उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील रहिवासी असलेल्या ललितने एफआयएच प्रो लीग २०२४-२५ च्या युरोपियन टप्प्यातील भारताच्या शेवटच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली. यामध्ये त्यांनी बेल्जियमविरुद्ध सामना खेळला होता. मात्र, भारतीय जर्सीतला त्यांचा अखेरचा सामना १५ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता.
ललितने भारतासाठी सीनियर स्तरावर १८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ६७ गोल केले. त्यांची बहुपरकीय कौशल्यं, मैदानावरील समजूतदारपणा आणि दडपणाखाली शांतपणे खेळण्याची शैली यामुळे ते भारताच्या आघाडीच्या फळीतील एक विश्वासार्ह नाव ठरले.
२०१४ साली हॉकी विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करत त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दोन वेळा ऑलिंपिक पदक पटकावून आधुनिक भारतीय हॉकीच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये आपले स्थान मिळवले.
ललित टोकियो २०२० ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते आणि त्यांनी पॅरिस २०२४ ऑलिंपिकमध्येही भारताला कांस्यपदक मिळवून दिले.
तसेच, त्यांनी २०१६ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१७ आशिया कप (जिथे त्यांनी चार गोल केले), २०१७ हॉकी वर्ल्ड लीग फायनल (कांस्य), २०१८ एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी (रौप्य), २०१८ आशियाई स्पर्धा (कांस्य) आणि २०१८ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (सुवर्ण) यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
२०२१-२२ च्या एफआयएच प्रो लीगमध्ये तिसरे स्थान मिळवणाऱ्या संघातही त्यांचा समावेश होता. याशिवाय, २०२२ च्या हांग्झो आशियाई खेळांत त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं.
भारतीय हॉकीमधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना २०२१ मध्ये प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
हॉकी इंडिया अध्यक्ष दिलीप टिर्की यांनी म्हटले, “ललित हे आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट आणि समर्पित फॉरवर्डपैकी एक आहेत. त्यांनी नेहमीच भारताची जर्सी अभिमानाने घातली आणि आपल्या मनापासून खेळले.”
ते पुढे म्हणाले, “वाराणसीच्या गल्ल्यांमधून दोन वेळा ऑलिंपिक पदकांपर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आम्ही त्यांच्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”
हॉकी इंडिया महासचिव भोला नाथ सिंह यांनीही ललितच्या योगदानाचे कौतुक करत म्हटले, “ललित हे हॉकीचे खरे राजदूत होते. मैदानाबाहेर सौम्य आणि मैदानावर धाडसी. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी आणि मोठ्या सामन्यांमधील आत्मविश्वासामुळे ते संघाचा आधारस्तंभ ठरले.”
