भारताला २०१२ मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद सध्या अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) २०२५ स्पर्धेत खेळत असून, त्याने आपल्या आक्रमक खेळाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
डलास येथे पार पडलेल्या एमएलसीच्या १२व्या सामन्यात उन्मुक्त चंदने लॉस एंजिल्स नाईट रायडर्सकडून खेळताना शानदार फलंदाजी केली. त्याच्या नाबाद ८६ धावांच्या खेळीमुळे लॉस एंजिल्सने सिएटल ओर्कासवर ७ गडी राखून विजय मिळवला. या खेळीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा सन्मानही देण्यात आला.
या सामन्यात सिएटल ओर्कासने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १७७ धावा केल्या. आरोन जोन्सने ३६ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या, तर डेव्हिड वॉर्नरने ३८ आणि शायन जहांगीरने २६ धावांची भर घातली. लॉस एंजिल्सकडून आंद्रे रसेलने ३ गडी बाद केले, तर ड्राय, शेडली वॅन शाल्कविक आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
लॉस एंजिल्स संघाने १७८ धावांचा पाठलाग करताना सुरुवातीस दोन विकेट लवकर गमावल्या. मात्र, त्यानंतर उन्मुक्त चंद आणि सैफ बदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी करत संघाला भक्कम स्थितीत आणले. सैफ बदरने ३२ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रोवमॅन पॉवेलला फक्त १ धावच करता आली.
उन्मुक्त चंदने मात्र दुसऱ्या बाजूला नेटाने फलंदाजी करत राहात ५८ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने नाबाद ८६ धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात त्याला शेरफेन रदरफोर्डची साथ मिळाली, ज्याने ९ चेंडूंमध्ये नाबाद २० धावा करत सामना समाप्त केला.
सिएटलकडून कैमरून गॅनन, हरमीत सिंग, जसदीप सिंग आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
एकेकाळी भारतीय संघासाठी खेळण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या उन्मुक्त चंदने भारतात संधी न मिळाल्यामुळे अमेरिकेत स्थलांतर केले असून, आता तिथे तो आपले क्रिकेटी स्वप्न पुन्हा उधळताना दिसतो आहे.
