आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील चकमकीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली आणि त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले. जितेंद्र आव्हाड त्यांना आलेल्या धमकीबद्दल बोलत असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यांना थांबवले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आज बाहेर एकट्या पडळकर यांना शिव्या पडत नाहीत तर सगळ्यांनाच लोक शिव्या घालत आहेत. लोक म्हणत आहेत की, आमदार माजले आहेत. काल जे झाले त्यामुळे एका आमदाराची प्रतिष्ठा पणाला लागली नाही तर संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली. हे योग्य नाही.
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी आपल्याला आलेल्या धमकीच्या मेसेजबद्दल बोलण्यास सुरुवात केली तेव्हा फडणवीस म्हणाले की, हा उल्लेख करायला हरकत नाही पण जो विषय सुरू आहे, त्यावर बोला. अध्यक्षांनी एक प्रस्ताव मांडलेला असताना त्यावर बोलायला नको का? आव्हाड यांना जे म्हणायचे आहे ते स्वतंत्रपणे मांडता येईल. जयंत पाटील तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
फडणवीसांनी सुनावले की, आपण ज्या प्रतिष्ठेची चर्चा करत आहोत, ती फक्त एका व्यक्तीची प्रतिष्ठा नाही तर संपूर्ण विधिमंडळाची प्रतिष्ठा आहे. लोक आमदार माजलेत असे म्हणू लागले आहेत. त्यामुळे आता राजकारण करून चालणार नाही.
हे ही वाचा:
आमदार रोहित पवारांची पोलिसांशी अरेरावी
युरोपची डबलढोलकी भरतेय भारताची तिजोरी…
भारताचा पहिला ‘अँग्लो-इंडियन वर्ल्ड कप हिरो
अभ्यागतांना आता प्रवेश नाही
विधिमंडळाच्या लॉबीत ही हाणामारी झालेली असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही कडक नियम करण्याचे सुतोवाच केले. ते म्हणाले की, विधिमंडळाच्या उच्च प्रथा व परंपरांचे आपण पालन केले पाहिजे. त्यामुळे यापुढे अधिवेशनाच्या काळात फक्त आमदार, अधिकृत स्वीय सहाय्यक, शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश मिळेल. इतर कोणत्याही अभ्यागताना प्रवेश नाही. विधानमंडळ परिसरात ज्या बैठका घेतल्या जातील त्या यापुढे मंत्र्यांनी आपापल्या दालनात घ्याव्यात. त्या घेतानाही विधानसभेचे अध्यक्ष व सभापती यांची मंडळाने परवानगी घेततल्याशिवाय बैठका घेता येणार नाहीत, असेही नार्वेकर म्हणाले.
हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सोपविण्यात येणार आहे.







