भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे २३ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. सौराष्ट्र क्रिकेट संघाने त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली आहे.
दिलीप दोशी यांनी आपल्या शानदार क्रिकेट कारकिर्दीत ८९८ प्रथम श्रेणी बळी मिळवले. यामध्ये त्यांनी ४३ वेळा डावात पाच बळींचा पराक्रम केला आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्येही त्यांनी ७५ गडी बाद केले. रणजी क्रिकेटमध्ये अनेक वर्षे ते बंगालचे प्रमुख गोलंदाज होते, तसेच त्यांनी सौराष्ट्रचेही प्रतिनिधित्व केले.
विशेष म्हणजे, दिलीप दोशी यांनी ३२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी भारताकडून ३३ कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये ११४ बळी घेतले. कसोटी कारकिर्दीत त्यांनी ६ वेळा पाच किंवा अधिक बळी घेतले. वनडे प्रकारात त्यांनी १५ सामने खेळून २२ गडी बाद केले.
🇮🇳 जिद्दीची कहाणी: फ्रॅक्चर असूनही खेळले भारतासाठी
१९८१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळताना दिलीप दोशी यांच्या पायाला फ्रॅक्चर होते. तरीही त्यांनी सामना खेळण्याचा निर्धार केला आणि ५ बळी घेतले. त्यांच्या या शानदार कामगिरीमुळे भारताने तो सामना ५९ धावांनी जिंकला.
🌹 श्रद्धांजली
भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या भावना ‘एक्स’वर व्यक्त करत लिहिले,
“मी दिलीपभाईंना पहिल्यांदा १९९० मध्ये यूके दौऱ्यात भेटलो. त्यांनी नेटमध्ये मला बॉलिंग केली होती. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांच्या उबदार स्वभावाची कायम आठवण येईल. ओम शांती.”
भारताचे माजी स्पिनर अनिल कुंबळे यांनीही लिहिले,
“दिलीपभाई यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन हेलावलं. त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना या दुःखाचा सामना करण्याची ताकद मिळो.”
दिलीप दोशी यांचे चिरंजीव नयन दोशी यांनी सौराष्ट्र आणि इंग्लंडच्या सरे संघाकडून क्रिकेट खेळले आहे. त्यांनी चार आयपीएल सामनेही खेळले.
