मुंबईचं हृदय — दादर. पण या हृदयात आज धडधड नाही, तर फटाक्यांचा साठा वाढतोय!
दिवाळीच्या सणात प्रकाशाच्या झगमगाटासोबत फटाक्यांची खुलेआम विक्री होतेय. रस्त्यांवर पावलोपावली फटाक्यांचे स्टॉल्स — गर्दीत उभे ठाकलेले, एकाला खेटून एक विक्रेते, आणि त्यांच्याभोवती फिरणारी जनतेची वर्दळ. अगदी अंगावर काटा आणणारी दृश्यं!
१९९७ चं भय पुन्हा दादरमध्ये!
याच दादरमध्ये, १९९७ साली डिसिल्व्हा गल्लीत फटाक्यांच्या स्टॉलला लागलेल्या आगीत सात-आठ स्टॉल्स जळून खाक झाले होते. आग विसावा हॉटेलपर्यंत पसरली होती. सुदैवाने जीवितहानी टळली, पण ती मोठी शिकवण होती. त्यानंतर फटाक्यांच्या स्टॉल्सना कडक बंदी घालण्यात आली होती.
पण आता — २०२५ मध्ये तीच चूक पुन्हा! दादरच्या रस्त्यांवर सध्या ५० पेक्षा जास्त फटाक्यांचे स्टॉल्स उभे ठाकले आहेत… आणि तेही प्रशासनाच्या डोळ्यासमोर!
“बजरंग गुप्ता” नावावर पैसा जमा?
स्थानिक व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्टॉल्ससाठी प्रत्येक विक्रेत्याकडून ३० हजार रुपये आकारले जातात. हे पैसे बजरंग गुप्ता नावाच्या व्यक्तीकडे जात असून, तो हे पैसे बीट ऑफिसरच्या नावावर जमा करतो, असा आरोप आहे.
बीएमसीकडून केवळ नावापुरती कारवाई करण्यात आली — दोन-तीन स्टॉल्सवर थोडंफार अॅक्शन, पण बाकी सर्व धंदे सुरूच!
राजकीय आशीर्वादाखाली धंदा फुलतोय!
रानडे रोड, डिसिल्व्हा रोड, जावळे मार्ग — सर्वत्र फटाक्यांचे साम्राज्य.
एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा स्टॉल जोरात चालतोय, असं स्थानिक सांगतात.
दादर स्टेशन परिसरात फटाक्यांना स्पष्ट बंदी असताना, तिथे खुलेआम विक्री चालतेय.
बीट ऑफिसर दीड वर्षांपासून त्याच पदावर — कोणाच्या आशीर्वादाने? हा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.
ब्रिजखाली परप्रांतीय फेरीवाले, भाड्याने जागा विक्री!
दादर ब्रीजखाली आज ८० टक्के फेरीवाले परप्रांतीय आहेत.
ना ते इथले रहिवासी, ना मतदार. तरी प्रत्येक जागेचं दररोजचं हजार ते बाराशे रुपयांचं भाडं आकारलं जातं.
फुटपाथवरून रस्त्यावर आलेले हे फेरीवाले आता ब्रिजखाली स्टॉल्स थाटत आहेत.
परिणाम — चालायला जागा नाही, मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या, गर्दीत श्वास घेणंही कठीण झालंय.
बीएमसी आणि पोलिस दोघेही गप्प!
बीट चौकीसमोरच फटाक्यांची उघड्यावर विक्री सुरू आहे.
पोलिसांना हे दिसत नाही का? की कानाडोळा केला जातोय?
महापालिका आणि पोलिस दोघांच्याही आशीर्वादाने हा फटाक्यांचा धंदा फुलतोय, असा नागरिकांचा संशय अधिकच गडद होत चाललाय.
जर पुन्हा आग लागली तर जबाबदार कोण?
१९९७ ची आग पुन्हा पेटली तर जबाबदार कोण?
बजरंग गुप्ता? बीएमसी? पोलिस?
की आपण — शांत राहणारे नागरिक?
आता पुरे झाली शांतता!
दादरचा श्वास अडकवणाऱ्या या अव्यवस्थेविरोधात आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.
दादरकरांनी गप्प बसू नका. तुमचं शहर धोक्यात आहे.
जागो दादरकर जागो!







