१६ महिन्यांपासून सुरू असलेल्या गाझा युद्धाला विराम देण्यासाठी झालेल्या युद्धबंदी कराराचा भाग म्हणून पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने शनिवारी (२२ फेब्रुवारी) आणखी सहा इस्रायली बंधकांना मुक्त केले. मात्र, याच दरम्यान एक आश्चर्यकारक घटना घडली. हमासने मुक्त केलेल्या सहा इस्रायली ओलिसांपैकी ओमर शेम तोव्ह याने स्टेजवर हमासच्या दोन दहशतवाद्यांचे चुंबन घेतले. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांचे चुंबन घेतलेल्या ओमर शेम तोव्ह याचे वक्तव्य समोर आले आहे. दहशतवाद्यांनीच चुंबन घेण्यास सांगितले होते, असे ओमर शेम तोव्ह याने म्हटले आहे.
डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, घरी परतल्यानंतर ओमर शेम तोव्हने दावा केला की, दबावाखाली अपहरणकर्त्यांचे चुंबन घेतले होते आणि त्याला “तसे करण्यास सांगितले होते”. शेम टोव्हच्या वडिलांनी सांगितले की त्याच्या अपहरणकर्त्यांनी “त्याला त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या [मुखवटा घातलेल्या] अपहरणकर्त्याच्या डोक्यावर चुंबन घेण्यास आणि हात हलवण्यास भाग पाडले”. ते पुढे म्हणाले की, ओमर शेम तोव्हला पुढे काय करायचे ते सांगण्यात आले होते. फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की कोणीतरी त्याच्याकडे आले आणि त्याला काय करायचे ते सांगितले. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलमधील नोव्हा संगीत महोत्सवाच्या ठिकाणाहून ओमर शेम तोव्हचे अपहरण केले होते.
हे ही वाचा :
कन्नड समर्थक कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राने कर्नाटकला जाणारी बससेवा केली बंद!
‘छावा’ चित्रपटाने औरंगजेबाच्या कबरीलाच आव्हान दिलंय !
पवारांच्या ‘त्या’ कर्तृत्त्वाचा सूत्रधार कोण होता ?
विदेशी बायकोचे उपद्व्याप, गोगोईंच्या डोक्याला ताप?
दरम्यान, युद्धबंदी कराराच्या प्रतिसादात इस्रायल ६२० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. त्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा किंवा इतर शिक्षा भोगणाऱ्या १५१ कैद्यांचा समावेश आहे, त्यापैकी सुमारे १०० जणांना इतर देशांमध्ये पाठवले जाईल, असे पॅलेस्टिनी कैद्यांच्या मीडिया ऑफिसने म्हटले आहे.
यामध्ये ४४५ पुरुष तसेच १५ ते १७ वयोगटातील १८ मुले, १८-१९ वयोगटातील पाच मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांना सध्याच्या युद्धादरम्यान गाझामध्ये इस्रायली सैन्याने ताब्यात घेतले होते, असे मीडिया ऑफिसने म्हटले आहे.