आयसीसीने महिला टी-२० क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहेत. याचबरोबर भारतीय खेळाडूंनी विविध विभागांमध्ये उल्लेखनीय प्रगती नोंदवली आहे.
महिला टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा यांनी मागील आठवड्याप्रमाणेच यावेळीही पहिलं स्थान कायम राखलं आहे. भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंह यांनी आठ स्थानांची झेप घेत टॉप-१० मध्ये प्रवेश केला असून त्या सातव्या स्थानावर पोहोचल्या आहेत.
या यादीत ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँड दुसऱ्या, पाकिस्तानची सादिया इक्बाल तिसऱ्या, इंग्लंडची सोफी एक्लेस्टन चौथ्या आणि लॉरेन बेल पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची एन म्लाबा सहाव्या, ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया वेअरहॅम आठव्या स्थानावर असून तिला एका स्थानाचं नुकसान झालं आहे. इंग्लंडची चार्ली डीन नवव्या तर वेस्ट इंडिजची अफी फ्लेचर दहाव्या स्थानावर आहे. दोघींनाही प्रत्येकी एका स्थानाचं नुकसान झालं आहे.
महिला टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी अव्वल स्थानावर आहे. वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज दुसऱ्या तर भारताची स्मृती मंधाना तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्राथ चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड्ट पाचव्या स्थानावर आहे.
श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा हिला मोठा फायदा झाला आहे. चार स्थानांची झेप घेत शेफाली सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू सातव्या, दक्षिण आफ्रिकेची ताजमिन ब्रिट्स आठव्या, न्यूझीलंडची सुझी बेट्स नवव्या आणि भारताची जेमिमा रोड्रिग्ज दहाव्या स्थानावर आहे. सातव्या ते दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना प्रत्येकी एका स्थानाचं नुकसान झालं आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पंधराव्या स्थानावर आहे. तर भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष हिने सात स्थानांची मोठी झेप घेत एकविसावं स्थान गाठलं आहे.







