अमेरिकेतील Smithsonian National Air and Space Museum मध्ये आता भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यशाचे एक अनोखे प्रतीक प्रदर्शित करण्यात आले आहे. आधुनिक विमाने आणि अंतराळ यानांच्या प्रदर्शनामध्ये भारतीय शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ यांची साडी ठेवण्यात आली आहे. त्यांना भारताची ‘रॉकेट वुमन’ म्हणूनही ओळखले जाते.
वॉशिंग्टन डीसी येथील स्मिथसोनियन संग्रहालयाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले की, ही साडी वरकरणी सामान्य वाटत असली तरी तिच्यामागे भारताच्या ऐतिहासिक Mars Orbiter Mission (मंगळयान) मोहिमेच्या यशाची प्रेरणादायी कहाणी दडलेली आहे. नंदिनी हरिनाथ यांनी ही निळ्या आणि लाल रंगाची साडी त्या दिवशी परिधान केली होती, ज्या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मंगळयान पृथ्वीची कक्षा सोडून मंगळ ग्रहाच्या सुमारे ३०० दिवसांच्या प्रवासाला रवाना झाले होते.
नंदिनी हरिनाथ या मंगळयान मोहिमेच्या डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर होत्या. मोहिमेचे नियोजन आणि यशस्वी संचालनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही मोहीम मूळ नियोजित ६ ते १० महिन्यांपेक्षा खूप अधिक काळ यशस्वी ठरली आणि मंगळयान तब्बल ८ वर्षे मंगळ ग्रहाच्या कक्षेत कार्यरत राहून तेथील पृष्ठभाग आणि वातावरणाचा अभ्यास करत राहिले. या यशामुळे भारत मंगळ ग्रहावर पोहोचणारा पहिला आशियाई देश आणि जगातील चौथा देश ठरला.
संग्रहालयाने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, नंदिनी हरिनाथ यांसारख्या महिला शास्त्रज्ञांनी भारताला या ऐतिहासिक टप्प्यापर्यंत पोहोचवण्यात मोठे योगदान दिले आहे. संग्रहालयाने या साडीचे तपशीलही दिले आहेत. हा दोन भागांचा पोशाख असून त्यामध्ये निळ्या रंगाच्या भूमितीय डिझाइन असलेली रेशमी चोळी आणि लाल-निळ्या नमुन्यांची साडी आहे. साडीच्या कडा आणि पदरावर निळ्या रंगाचे डिझाइन असून चोळी आणि साडीवर पिवळा, नारिंगी, हिरवा आणि लाल रंगातील ‘फ्रेंच नॉट्स’ शैलीतील भरतकाम करण्यात आले आहे.
ही साडी संग्रहालयातील ‘Future in Space’ गॅलरीमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. या गॅलरीद्वारे प्रेक्षकांना “अंतराळात कोण जाईल?”, “आपण तिथे का जातो?” आणि “तिथे जाऊन आपण काय करू?” अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करण्यास प्रवृत्त केले जाते. संग्रहालयाच्या टीमने पुढे म्हटले की, “नंदिनी हरिनाथ यांची ही साडी कधीही पृथ्वीचे वातावरण पार करू शकली नाही, पण ती परिधान करणाऱ्या महिलेने भारताला दुसऱ्या ग्रहापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.”







