महिला विश्वकप २०२५ दरम्यान इंदूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंशी छेडछाड झाल्याची घटना समोर आली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ऑस्ट्रेलिया संघ शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६वा सामना खेळणार आहे, मात्र त्याआधीच ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हॉटेल रेडिसन ब्लूहून कॅफेकडे पायी जात असताना एका बाईकस्वाराने त्यांच्याशी छेडछाड केली. खेळाडूंनी तत्काळ एसओएस नोटिफिकेशन पाठवल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
सुरक्षा अधिकारी डेनी सिमन्स यांच्या तक्रारीवरून एमआयजी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, हॉटेल रेकॉर्ड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही खेळाडूंना भेटून त्यांचे जबाब घेतले. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ७४ (महिलेच्या सन्मानाला ठेस पोहोचविण्यासाठी आपराधिक बलाचा वापर) आणि कलम ७८ (पाठलाग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी स्थानिक डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असून त्याची बाईक जप्त करण्यात आली आहे. तपासात समोर आलं आहे की त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
या घटनेवर राज्याचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ही फक्त एखाद्या महिला खेळाडूशी गैरवर्तनाची बाब नाही, तर देशाच्या सन्मानालाच ठेस पोहोचवणारी आहे. अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणीही पुन्हा देशाच्या प्रतिष्ठेशी खेळ करणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “मध्य प्रदेश सरकार या प्रकरणात शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करत आहे. दोषी सिद्ध झाल्यास त्याला केवळ शिक्षा नाही, तर उदाहरण बनवणारी शिक्षा दिली जाईल. भारत हा ‘अतिथी देवो भवः’ संस्कृतीचा देश आहे; अशा घटना त्या परंपरेलाच धक्का देणाऱ्या आहेत.”
दरम्यान, ऑस्ट्रेलियन महिला संघाने आतापर्यंत सहा सामन्यांपैकी पाच विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान कायम ठेवले आहे. न्यूझीलंडवर ८९ धावांनी विजय, श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द, पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय, भारतावर ३ विकेट्सनी मात, बांग्लादेशला १० विकेट्सनी आणि इंग्लंडला ६ विकेट्सनी हरवून त्यांनी सेमीफायनल गाठला आहे.
महिला विश्वकप २०२५ साठी चार संघ निश्चित झाले आहेत — ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत.
पहिला उपांत्य सामना २९ ऑक्टोबरला गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर, तर दुसरा सामना ३० ऑक्टोबरला नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.







