हरियाणाच्या कनकने जर्मनीच्या सुहल शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग क्रीडा महासंघाच्या (ISSF) ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. कनकने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत २४ शॉटमध्ये २३९.० गुण मिळवत मोल्दोव्हा देशाच्या दोन वेळच्या ऑलिम्पियन अन्ना डुल्सला १.७ गुणांनी पराभूत केले.
चीन तैपेईच्या चेन येन-चिंगने कांस्य पदक पटकावले.
स्पर्धेपूर्वी झालेल्या पात्रता फेरीत भारताच्या कनक आणि प्राची या दोघींनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. कनकने ५७२ तर प्राचीने ५७१ गुण मिळवले होते.
गेल्या वर्षी पेरूमधील लीमा येथे झालेल्या जागतिक ज्युनियर स्पर्धेत रौप्यपदक विजेती कनक हिने अंतिम टप्प्यात अनुभवाचा कस दाखवत अत्यंत महत्त्वाच्या क्षणी ‘१०’ चा अचूक निशाणा साधला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
स्पर्धेनंतर कनक म्हणाली, “सुरुवातीला मी थोडी नर्वस होते, पण मला आनंद आहे की मी चांगली कामगिरी करू शकले.”
सुरुवातीपासूनच प्राची पदकाच्या शर्यतीत होती, पण १५व्या शॉटमध्ये मिळालेल्या ८.६ गुणांमुळे तिची गाडी अडखळली. याच क्षणी कनकने १०.५ चा स्कोर करत आघाडी घेतली आणि शेवटच्या नऊ शॉटमध्ये जबरदस्त अचूकता दाखवली. तिच्या ९.४ गुणांवर काहीसा प्रश्न उपस्थित झाला, पण त्यावेळी ती जिंकण्याच्या मार्गावर होतीच.
