केरळमध्ये एकाच वेळी शिगेला आणि निपाह या दोन संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. जून महिन्यात शिगेला संसर्गाचा वेगाने फैलाव होत असून राज्यात आणखी १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे या महिन्यातील एकूण शिगेला रुग्णसंख्या १३३ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या संसर्गामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या रुग्णांमध्ये कोझिकोडमधील चार, मलप्पुरम आणि कन्नूरमधील प्रत्येकी तीन, पलक्कडमधील दोन आणि कोल्लममधील एका रुग्णाचा समावेश आहे. कोझिकोड आणि वायनाड हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित ठरत असून दूषित पाणी, अन्नपदार्थ आणि अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या या संसर्गाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. यावर्षी आतापर्यंत केरळमध्ये शिगेलाचे एकूण २०९ रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे.
हे ही वाचा:
युद्ध पेटलं की कोण कमावतो?
प्रगतीचा मार्ग- ६७ लाख किलोमीटर
विमानात सलग २२ तास बसू शकता का?
पुन्हा एकदा होर्मुझला टाळे…इराणने केला दावा
शिगेला हा अत्यंत संसर्गजन्य जीवाणूजन्य आजार असून त्यामध्ये तीव्र अतिसार, ताप, पोटदुखी आणि उलट्यांसारखी लक्षणे दिसून येतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांसाठी हा आजार अधिक धोकादायक मानला जातो. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्याचे, अन्नपदार्थ स्वच्छ ठेवण्याचे आणि वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, निपाह विषाणूबाबत मात्र दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोझिकोडमध्ये निपाह संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि नंतर लक्षणे आढळलेल्या १५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये एका आरोग्य कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने संभाव्य संसर्ग साखळी तुटल्याचे संकेत मिळत आहेत.
तरीही प्रशासनाने सावध भूमिका कायम ठेवली आहे. निपाह बाधित रुग्ण सध्या कोझिकोड सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत असून त्याच्या संपर्कातील १०४ जणांवर आरोग्य विभागाचे बारकाईने निरीक्षण सुरू आहे. यापैकी चार जणांना अतिधोकादायक, १४ जणांना उच्च-धोका तर ८६ जणांना कमी-धोका गटात ठेवण्यात आले आहे. तसेच बाधित परिसरातील ८१ घरांना भेट देत आरोग्य पथकांनी तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवली आहे.
एकीकडे शिगेलाचा वाढता प्रादुर्भाव आणि दुसरीकडे निपाहचा संभाव्य धोका या दुहेरी आव्हानामुळे केरळची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. निपाहच्या संशयित संपर्कांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असला तरी शिगेलाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील संसर्गजन्य आजारांचे संकट अद्याप कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
