दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर आम आदमी पक्षाला आता आणखी एक धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार आहेत. भ्रष्टाचार प्रकरणात दोघांविरुद्ध पुढील कारवाईसाठी गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
दिल्लीच्या उपराज्यपाल कार्यालयाने ही माहिती दिली. दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालय विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम १७-अ अंतर्गत दिल्ली सरकारचे माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध चौकशीसाठी गृह मंत्रालयाकडून मंजुरी मागितली होती. त्याचप्रमाणे सत्येंद्र जैन यांच्यावर पुढील कारवाईसाठी देखील परवानगी मागण्यात आली होती. या मागणीचा विचार करून गृह मंत्रालयाने दोघांविरुद्ध पुढील कारवाईला परवानगी दिली आहे.
हे ही वाचा :
दुखापतग्रस्त राहुल द्रविड कुबड्या घेऊन रॉयल्सच्या प्रशिक्षण शिबिरात
पाकने बेजबाबदार वक्तव्ये करण्यापेक्षा अंतर्गत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावं
आयपीएल २०२५ ईशान किशनसाठी सुवर्णसंधी!
बीएलएच्या ताब्यात अजूनही १५४ जवान? प्रत्यक्षदर्शी सैनिकाने पाक सेनेचा दावा केला उघड!
मनीष सिसोदिया हे उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात तुरुंगात जाऊन आले आहेत. २०२१-२२ च्या दारू धोरणाच्या अंमलबजावणीत अनियमितता आणि भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही खाजगी कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी सिसोदिया यांनी दारू धोरण आखल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला आहे. गोवा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी दारू व्यापाऱ्यांकडून १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सिसोदिया तुरुंगात गेले होते.
तर सत्येंद्र जैन मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला सामोरे जात आहेत. सत्येंद्र जैन यांना ३० मे २०२२ रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. २०१५-२०१६ मध्ये बनावट कंपन्यांद्वारे १६.३९ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, आता गृह मंत्रालयाच्या पुढील कारवाईच्या मंजुरीनंतर दोनही प्रकरणांमधील तपास प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दोनही नेते सध्या जामिनावर बाहेर आहेत.