भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या विशेष बैठकीत २०३६च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले. ऑलिम्पिक समितीची ही १४१वी बैठक होती. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख थॉमस बाक उपस्थित होते.
पंतप्रधानांनी यावेळी सांगितले की, ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी भारत खूप उत्सुक आहे. २०३६च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत सर्वप्रकारचे प्रयत्न करणार आहे. हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सहाय्याने भारत हे स्वप्न नक्की पूर्ण करू शकतो. खेळाच्या सहाय्याने केवळ पदके जिंकली जात नाहीत तर मनेही जिंकली जातात. ऑलिम्पिकमधून केवळ अजिंक्यवीर घडत नाहीत तर त्यातून शांतीचा संदेशही देता येतो.
भारताची २०२९मध्ये युवा ऑलिम्पिक आयोजित करण्याचीही इच्छा आहे. त्यासाठी आयओसीचा आम्हाला नक्कीच पाठिंबा मिळेल. भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची ही बैठक तब्बल ४० वर्षांनंतर आयोजित केली. याआधी १९८३मध्ये दिल्लीत ही बैठक झाली होती.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. १५ ते १७ ऑक्टोबर या काळात हे सत्र होत आहे. भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धांसाठी या बैठकीत विचार केला जाणार आहे.
हे ही वाचा:
भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय
प्रशांत किशोर यांनी दिले नीतिश कुमारांना आव्हान
इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे
ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी यावेळी नमस्ते म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपका बहोत बहोत स्वागत है असे म्हणत या बैठकीत त्यांचे स्वागत केले. भारत आर्थिक आणि क्रीडा अशा दोन्ही क्षेत्रात चांगली प्रगती करत असल्याचेही ते म्हणाले. बाक यांनी सांगितले की, भारत हा प्रेरणादायी असा देश आहे. संपूर्ण ऑलिम्पिक जगताला भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशाचा अभिमान वाटतो. ऑलिम्पिक कार्यक्रमात ई स्पोर्ट्सचा समावेश करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
शुक्रवारी बाक यांनी क्रिकेटचा २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचे बोलून दाखविले होते. ते म्हणाले होते की, क्रिकेट हे जगात लोकप्रिय आहे. सध्या वर्ल्डकपचे आयोजनही भारतात यशस्वीरित्या होत आहे. त्यामुळे २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा नक्की विचार केला जाईल.
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितले की, भारत निश्चितच २०३६च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी सज्ज आहे. आयओसीच्या या बैठकीत भारत ऑलिम्पिक आयोजनाचा आराखडा ठेवेल. बाक यांनी २०३६च्या ऑलिम्पिक आयोजनाची संधी देताना भारत हा नक्कीच एक प्रमुख दावेदार असू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. भारत ज्या पद्धतीने विकसित होत आहे, ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांत यश मिळवत आहे, ते पाहता त्यांच्याकडे मोठी क्षमता असल्याचे दिसते.