पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार, ११ एप्रिल रोजी त्यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पोहचले होते. यावेळी विमानातून उतरताच नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचे पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून वाराणसी सामुहिक बलात्कार प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. हे अधिकारी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर तैनात होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी या तीनही अधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा करत या प्रकरणाची दखल घेतली.
स्वागत करण्यासाठी धावपट्टीवर उपस्थित असलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी वाराणसीमधील सामुहिक बलात्कार प्रकरणाबाबत स्वतंत्रपणे बोलत असल्याचे दिसून आले. “वाराणसीमध्ये उतरल्यानंतर लगेचच, पंतप्रधानांना पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शहरात अलीकडील गुन्हेगारी बलात्काराच्या घटनेची माहिती दिली,” असे उत्तर प्रदेश सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. यानंतर नरेंद्र मोदींनी दोषींवर शक्य तितकी कठोर कारवाई करण्याचे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले, असेही म्हटले आहे.
१९ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, तरुणी २९ मार्च रोजी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. घरच्यांनी शोध घेतला मात्र हाती यश आले नाही आणि नंतर कुटुंबीयांनी ३ एप्रिल रोजी पोलिसांशी संपर्क साधला. ४ एप्रिल रोजी पोलिसांना तरुणी सापडली. तिची प्रकृती खूपच वाईट होती. उपचारानंतर, जेव्हा ती सामान्य झाली, तेव्हा तिने संपूर्ण घटना सांगितली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला आमिष दाखवून नेण्यात आले आणि अनेक दिवस तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडितेने आरोप केला आहे की, सात दिवसांच्या कालावधीत २३ जणांनी तिच्यावर बलात्कार केला. पोलिस अजूनही इतर आरोपींचा शोध घेत आहेत. तरुणीला अनेक वेळा अनेक लोकांनी दारू पाजली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. इतक्या पुरूषांचा सहभाग असल्यामुळे हा एक नियोजित प्रयत्न वाटत आहे.
हे ही वाचा:
दहशतवादी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण आणि २०११ चे मोदींचे ट्वीट व्हायरल; काय आहे प्रकरण?
‘पंजाबचा टॉयलेट किंग’, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह नेते होतायेत ट्रोल!
ट्रम्प यांच्या सवलतीनंतर भारतीय शेअर बाजार रुळावर; सेन्सेक्समध्ये उसळी
चीनला दणका; आयातीवरचा कर १२५ टक्के नव्हे, तर १४५ टक्के! कसा ते घ्या जाणून
कोणत्याही आरोपीला ओळखत नसल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, योगी आदित्यनाथ हे अशा प्रकरणांना कुशलतेने हाताळण्यासाठी ओळखले जातात. मी त्यांना आम्हाला न्याय देण्याची विनंती करतो. मी आरोपींना फाशी देण्याची मागणी करत नाही, परंतु शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की लोक कोणावरही बलात्कार करण्यापूर्वी दोनदा विचार करतील, असे ते पुढे म्हणाले.