मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून यशस्वी प्रत्यार्पण भारतात करण्यात आले. यामुळे अखेर हल्ल्यातील शेकडो पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार आहे. तहव्वूर राणा याला भारतात पोहचताच एनआयएने अटक केली असून सध्या त्याला एनआयए कोठडी सुनवण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक जुनी एक्स पोस्ट व्हायरल होत आहे. तहव्वूर राणा संदर्भातील ही पोस्ट आहे.
तहव्वूर राणा हा गुरुवारी (१० एप्रिल) संध्याकाळी दिल्लीत पोहचला. त्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर लिहिलेली १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल झाली आहे. अमेरिकेने राणाला निर्दोष घोषित करून भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी २०११ च्या पोस्टमध्ये मागील काँग्रेस-नेतृत्वाखालील सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती.
२०११ मध्ये, अमेरिकेच्या एका न्यायालयाने निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या हल्ल्यांच्या कटात मदत करण्याच्या थेट भूमिकेतून राणा याला मुक्त केले होते, परंतु हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी गटाला पाठींबा दिल्याबद्दल दोषी ठरवले होते. यामुळे भारतातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तर २०११ साली यासदंर्भात तत्कालीन केंद्र सरकारवर ताशेरे ओढणारे ट्वीट नरेंद्र मोदींनी केले होते. “मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणाला निर्दोष घोषित केल्याने अमेरिकेने भारताच्या सार्वभौमत्वाला कलंक लावला आहे आणि हे परराष्ट्र धोरणातील मोठे अपयश आहे,” असे नरेंद्र मोदींच्या पोस्टमध्ये म्हटले होते. तहव्वूर राणा याची रवानगी आता भारतात होताचं त्यांचे ट्वीट पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे.
US declaring Tahawwur Rana innocent in Mumbai attack has disgraced the sovereignty of India & it is a “major foreign policy setback”
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2011
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नरेंद्र मोदींची ही जुनी पोस्ट शेअर केली असून राणाला कायद्याला सामोरे जाण्यासाठी यशस्वीरित्या भारतात प्रत्यार्पण केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. शिवाय अनेक वापरकर्त्यांनी पोस्टवर “मोदी है तो मुमकीन है” असे म्हटले. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी एक्स ही पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “ते विसरले नाहीत.”
फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाला भारतात प्रत्यार्पण करण्याची पुष्टी केली होती. राणानेही प्रत्यार्पण रोखण्यासाठी सर्व कायदेशीर मार्ग वापरून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केले. मात्र, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्याला गुरुवारी भारताच्या ताब्यात देण्यात आले.
हे ही वाचा:
ट्रम्प यांच्या सवलतीनंतर भारतीय शेअर बाजार रुळावर; सेन्सेक्समध्ये उसळी
चीनला दणका; आयातीवरचा कर १२५ टक्के नव्हे, तर १४५ टक्के! कसा ते घ्या जाणून
न्यूयॉर्क: हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून सीमेन्सच्या सीईओंचा मृत्यू
तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी; चौकशीतून कोणते खुलासे होणार?
पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वूर राणा हा या पूर्वी पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम करत होता. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात १६० हून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर आरोप आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, त्याला या दहशतवादी हल्ल्याची माहिती होती आणि तो पाकिस्तानातील दहशतवादी गट आणि त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात होता. २६/११ हल्ल्यामागील कटात राणाचा सहभाग असल्याचे त्याचा बालपणीचा मित्र आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीने उघड केले होते. चौकशीदरम्यान, हेडलीने सांगितले होते की तो २००७ ते २००८ दरम्यान पाच वेळा भारतात आला होता आणि मुंबई हल्ल्यांसाठी रेकी करत होता. त्याने मुंबई हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेची भूमिका देखील उघड केली आणि राणाच्या मदतीने आपली ओळख लपवण्यासाठी त्याने इमिग्रेशन कंपनी उघडली होती असे सांगितले. २०१३ मध्ये, राणाला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु २०२० मध्ये आरोग्याच्या कारणास्तव त्याची सुटका करण्यात आली. भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर त्याच वर्षीच्या अखेरीस त्याला पुन्हा अटक करण्यात आली.