बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. राजधानी ढाका येथील न्यायालयाने गुरुवारी (१० एप्रिल) शेख हसीना, त्यांची मुलगी सायमा वाजिद पुतुल आणि इतर १७ जणांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे.
या सर्वांवर फसवणूक करून निवासी भूखंड मिळवल्याचा आरोप आहे. ढाका येथील वरिष्ठ महानगर न्यायाधीश झाकीर हुसेन गालिब यांनी गुरुवारी भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (एसीसी) दाखल केलेले आरोपपत्र स्वीकारले. तथापि, आरोपी फरार आहेत, म्हणून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
आयोगाचे वकील मीर अहमद सलाम यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘वरिष्ठ न्यायाधीश झाकीर हुसेन गालिब यांनी एसीसीचे आरोपपत्र स्वीकारले आहे आणि अटक वॉरंट जारी केले आहे.’ ते पुढे म्हणाले की, न्यायाधीशांनी एसीसीला ४ मे रोजी सुनावणीसाठी या प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भ्रष्टाचार विरोधी आयोगाने १२ जानेवारी रोजी माजी पंतप्रधान हसीना आणि इतरांविरुद्ध खटला दाखल केला होता. आरोपपत्रानुसार, सायमा यांनी त्यांच्या आई आणि तत्कालीन पंतप्रधान हसीना शेख यांना भूखंड मिळवण्यासाठी प्रभावित केले होते.
हे ही वाचा :
दहशतवादी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण आणि २०११ चे मोदींचे ट्वीट व्हायरल; काय आहे प्रकरण?
ट्रम्प यांच्या सवलतीनंतर भारतीय शेअर बाजार रुळावर; सेन्सेक्समध्ये उसळी
चीनला दणका; आयातीवरचा कर १२५ टक्के नव्हे, तर १४५ टक्के! कसा ते घ्या जाणून
न्यूयॉर्क: हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून सीमेन्सच्या सीईओंचा मृत्यू
दरम्यान, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने यापूर्वी हसीना शेखसह त्यांचे राजकीय सहकारी आणि वरिष्ठ नागरी, लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसह इतर आरोपांवर अटक वॉरंट जारी केले होते. २०२० मध्ये, जेव्हा हसीना शेख सत्तेमध्ये होत्या तेव्हा देशाचे संस्थापक बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘मुजीब शताब्दी’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वर्षभर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि यासाठी सरकारी तिजोरीतून ४,००० कोटी रुपयांचा अपव्यय केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणाची देखील चौकशी सुरु असल्याचे भ्रष्टाचार विरोधी आयोगाने म्हटले आहे.