भारतातील हजारो लोक रोजगाराच्या शोधात आखाती देशांमध्ये जातात, जिथे ते कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबाची काळजी घेतात. परंतु कधीकधी काही लोक फसव्या एजंटांच्या तावडीत अडकतात आणि मोठ्या अडचणींचा सामना करत तिथेच अडकून पडतात. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील एक व्यक्ती २ वर्षांपूर्वी कामाच्या शोधात दुबईला गेला होता, परंतु काही दिवसांनी तो दुबईत कुठेतरी गायब झाला आहे. व्यक्तीच्या कुटुंबाने त्याचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, आतापर्यंत त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आता त्या व्यक्तीच्या मुलीने पंतप्रधान मोदींना मदतीचे आवाहन केले आहे.
झुंझुनूच्या उदयपूरवती तहसीलच्या मानकासस गावातील रहिवासी असलेले राकेश कुमार जांगीड हे दोन वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात दुबईला गेले होते. परंतु ६ जुलै २०२३ नंतर कुटुंबाला त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. कुटुंबाने ट्रॅव्हल एजंटवर आरोप केला आहे की, राकेशला ट्रॅव्हल एजंट हरिराम जांगीड आणि बनवारीलाल जांगीड यांनी फसवणूक करून दुबईला पाठवले होते. हे ट्रॅव्हल एजंट सीकर जिल्ह्यातील कात्राथल येथील रहिवासी आहेत.
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, ट्रॅव्हल एजंट हरिराम जांगिड आणि बनवारीलाल जांगिड यांनी राकेशला ‘गल्फ गेट टाइल वर्क’ नावाच्या कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने १,२०,००० रुपये घेतले आणि दोन महिन्यांत वर्क व्हिसा मिळवून देणार असल्याचे सांगितले. परंतु राकेशला फक्त टुरिस्ट व्हिसावर पाठवण्यात आले. राकेश २१ जून २०२३ रोजी जयपूरहून दुबईला निघाला आणि ६ जुलैपर्यंत ट्रॅव्हल एजंट हरिराम जांगिडसोबत तिथेच राहिला. ६ जुलै रोजी राकेशने पत्नीशी संपर्क साधला होता. मात्र, त्यानंतर आतापर्यंत कोणताही संपर्क झालेला नाही.
राकेशच्या पत्नीने दावा केला की ट्रॅव्हल एजंट हरिरामने तिला राकेश तुरुंगात असल्याची माहिती देणारा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता. यानंतर राकेशचा भाऊ माखनलाल जांगिड दुबईला गेला आणि तिथल्या अनेक तुरुंगात शोध घेतला, पण राकेशचे नाव किंवा रेकॉर्ड कुठेही सापडले नाही. त्याने दुबई पोलिसांकडे तक्रारही दाखल केली, परंतु त्याला कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.
कुटुंबाने उदयपूरवती पोलिस ठाण्यात हरिराम आणि बनवारीलाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. राकेशच्या पत्नीला संशय आहे की राकेशसोबत काहीतरी अनुचित घडले आहे, ज्यामध्ये या एजंटांची भूमिका असू शकते.
हे ही वाचा :
पनामातील मंदिरात खासदार सर्फराज पोहोचले आणि…
‘या’ दोन जवानांनी डिझाइन केला होता ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो!
‘वीर सावरकरांचे धाडस आणि संघर्ष देश कधीही विसरू नाही’
बांगलादेशमध्ये आंदोलनांची लाट; मोहम्मद युनूस सरकारवर वाढता दबाव
दरम्यान, अनेक प्रयत्नांनंतर निराश झाल्यानंतर, आता राकेशची मुलगी खुशी आणि पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, भारतीय दूतावास अबुधाबी आणि दुबई पोलिसांकडे व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आणि त्याला भारतात परत आणण्यासाठी आवाहन केले आहे.
कुटुंब मानसिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वाईट स्थितीत आहे आणि राकेशची एक झलक मिळण्याच्या आशेने दररोज वाट पाहत आहे. मुलगी खुशीने एका व्हिडिओमध्ये आवाहन केले आहे की, मोदीजी, मी तुम्हाला विनंती करते की कृपया माझ्या वडिलांना शोधण्यात मदत करा. माझे कुटुंब खूप अस्वस्थ आहे. मुलीने तिच्या वडिलांच्या जाण्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि तिच्या वडिलांना शोधण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला आवाहन केले.
