भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून दिल्लीत सुरू असलेल्या एआय समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बोलताना त्यांनी मोदींच्या गतीमान निर्णयाबद्दल आणि त्यांच्या दूरदृष्टीबद्दल आपला अनुभव सांगत कौतुक केले. त्यांनी भारतातील एआय (AI) च्या प्रसाराविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेतील एक किस्सा सांगितला. नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये बोलताना निलेकणी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी एआयचा वापर करण्याबाबत ते पंतप्रधानांशी चर्चा करत होते. त्यावेळी पंतप्रधानांनी विचारले की, हा तंत्रज्ञानाचा वापर गायी आणि जनावरांसाठी का करू नये? कारण गाय आजारी असल्यास ती आपली तब्येत बरी नसल्याचे सांगू शकत नाही.
निलेकणी म्हणाले की, त्यांनी ८ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांसाठी एआयचा वापर करण्याबाबत चर्चा केली. त्यावर पंतप्रधान म्हणाले, “आपण हा वापर गायी आणि जनावरांसाठी का करू शकत नाही? कारण गाय आजारी असेल तर ती आपल्याला सांगू शकत नाही की ती आजारी आहे.” “ही समस्या कशी सोडवता येईल?” असा प्रश्न विचारत पंतप्रधानांनी कृषी आणि दुग्ध व्यवसायात एआयचा वापर करण्याचे आपले दृष्टीकोन मांडले, असे निलेकणी यांनी सांगितले.
त्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयात माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील अधिकारी, अमूल आणि इतर सहकाऱ्यांसोबत बैठक झाली. निलेकणी यांनी पुढे सांगितले की, अवघ्या तीन आठवड्यांत हे ॲप प्रत्यक्षात सुरू झाले. ८ जानेवारी रोजी बैठक झाली आणि ११ फेब्रुवारी रोजी ॲप लाईव्ह झाले.
भारतामध्ये ३.६ दशलक्ष शेतकरी, दरवर्षी २ अब्ज दूध व्यवहार आणि ४० दशलक्ष जनावरे असलेली जगातील सर्वात मोठी सहकारी चळवळ आहे, असे त्यांनी नमूद केले. आज मोठ्या प्रमाणावर महिला शेतकरी ‘सरलबेन’ ॲपचा वापर करत आहेत. या ॲपद्वारे त्यांना जनावरांच्या आरोग्याविषयी, गर्भधारणेबाबत, दूध उत्पादनाबाबत आणि इतर समस्यांबाबत त्वरित माहिती मिळते. त्यामुळे एआयचा प्रसार झपाट्याने होत आहे.
हे ही वाचा:
टी20 विश्वचषक फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार?
राधा यादवचा ‘डबल धमाका’; भारत-अ ची फायनलकडे दिमाखात वाटचाल!
भारताची एआय नेतृत्वाकडे दमदार वाटचाल
‘थँक यू इंडिया’ इमॅन्युएल मॅक्रोन यांचा भावनिक निरोप
“८ जानेवारीला पंतप्रधानांच्या मनात आलेली कल्पना ११ फेब्रुवारीला प्रत्यक्षात उतरली. भारतातील एआयच्या अंमलबजावणीच्या वेगाचे हे उत्तम उदाहरण आहे. ३० डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांनी यूपीआयवरील भीम ॲप सुरू केले तेव्हाचा जो उत्साह होता, तोच उत्साह मला आता जाणवतो,” असे निलेकणी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आज दरमहा २१ अब्ज व्यवहार आणि ५०० दशलक्ष वापरकर्त्यांसह भारताची पेमेंट प्रणाली जगातील सर्वात मोठी झाली आहे. “एआयही अशाच टप्प्यावर आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एआयचा वापर सामान्य नागरिक, शेतकरी आणि कामगार यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय, या प्रकल्पात डेटा सार्वभौमत्वाला महत्त्व देण्यात आले आहे. अमूलचा डेटा अमूलकडेच राहील आणि संपूर्ण रचना भारतातच सुरक्षित राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवकेंद्रित आणि संवेदनशील जागतिक एआय परिसंस्था उभारण्यात या शिखर परिषदेची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असा विश्वास व्यक्त केला. इतिहासात मानवजातीने संकटांचे संधींमध्ये रूपांतर केले आहे आणि आजही तशीच संधी उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
भगवान बुद्धांच्या “योग्य कृती ही योग्य समजुतीतूनच येते” या शिकवणीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी एआयचा सकारात्मक परिणाम सुनिश्चित करण्यासाठी योग्य वेळी, योग्य हेतूने आणि योग्य निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली.
कोविड महामारीच्या काळात जगाने एकत्र येऊन अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या, याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, पूर्वी तंत्रज्ञानामुळे दरी निर्माण झाली होती; परंतु आता एआय सर्वांसाठी सुलभ आणि उपलब्ध असायला हवे. एआयच्या भविष्यासंदर्भातील चर्चेत ग्लोबल साउथच्या आकांक्षा आणि प्राधान्यांना केंद्रस्थानी ठेवले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.







