दरभंगा येथील इंडि आघाडीच्या कार्यक्रमातील एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातेसंदर्भातील कथित अपमानास्पद वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादावर जेडीयू नेते नीरज कुमार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश वा कोणत्याही नेत्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे नीरज कुमार यांनी म्हटले आहे.
एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अशा प्रकारच्या अपमानास्पद शब्दांचा वापर करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचा गट एकत्र येत आहे. सत्तेत असो वा विरोधी, मनाचे किंवा मतांचे मतभेद असू शकतात, परंतु पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश किंवा राजकीय पक्षाच्या प्रमुखांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
नीरज कुमार यांनी पुढे स्पष्ट केलं की, “कायदा आपले काम करेलच, पण काँग्रेस पक्षाने हे स्पष्ट करावं की ते अशा विधानांशी सहमत आहेत का? तसेच, तेजस्वी यादव यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. या प्रकरणात संबंधित कार्यकर्त्यावर पक्षाने शिस्तभंगाची कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वाद अधिकच तीव्र होत असून, इंडि आघाडीतील प्रमुख पक्षांकडून अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. यावरून भाजपाकडून कॉंग्रेस पक्षासह राहुल गांधींवर जोरदार टीका केली जात आहे.