दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (धुरंधर 2) चा ट्रेलर शनिवारी (७ मार्च) प्रदर्शित करण्यात आला. सुमारे साडेतीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणवीर सिंग अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसत असून, आपल्या भूतकाळातील रहस्ये उलगडत बदला घेण्यासाठी निघालेला त्याचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा जस्किरत सिंह रंगी ते हमजा असा प्रवास दाखवण्यात आला आहे. कथा कराची शहराच्या पार्श्वभूमीवर पुढे सरकते, जिथे त्याचे पात्र गुन्हेगारी जगतात स्वतःची ओळख निर्माण करत पुढे जाताना दिसते. ट्रेलरमध्ये त्याला “शेर-ए-बलोच” आणि लियारीचा नवा किंग म्हणून उदयाला येताना दाखवण्यात आले आहे. ट्रेलरची सुरुवात पहिल्या भागातील IC-814 अपहरणाच्या घटनेच्या दृश्यांपासून होते. त्यानंतर कथा दाखवते की, पहिल्या भागात रणवीरचे पात्र रहमान डकैतला ठार मारते आणि त्याची सत्ता ताब्यात घेत गुन्हेगारी साम्राज्यावर नियंत्रण मिळवते. चित्रपटात रहमान डकैतची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना यांनी साकारली आहे.
ट्रेलरमध्ये अनेक थरारक अॅक्शन सीन आणि प्रभावी संवाद पाहायला मिळतात. त्यापैकी रणवीर सिंगचा एक संवाद विशेष चर्चेत आला आहे- “आता पाकिस्तानचे भविष्य हिंदुस्तान ठरवेल.” ट्रेलर शेअर करताना रणवीर सिंगने सोशल मीडियावर लिहिले, “मी आधीच सांगितले होते की हे वैयक्तिक आहे…”
हे ही वाचा:
सोने-चांदीत पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१.६१ लाखांच्या जवळ
आखाती देशांवरील हल्ल्यांबाबत इराणची माफी
तेहरानमधील मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्ष्य
सत्य आले समोर…रशियाचे तेल विकत घेण्याची अमेरिकेकडून करण्यात आली होती विनंती
चित्रपटात रणवीर सिंगसोबत संजय दत्त, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये सारा अर्जुन हिला देखील बंदूक हातात घेतलेल्या आक्रमक अवतारात दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे.
‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट ‘धुरंधर’ या चित्रपटाचा सिक्वेल असून या मालिकेचा दुसरा आणि अंतिम भाग आहे. दोन्ही भागांचे चित्रीकरण एकाच वेळी करण्यात आले होते. पहिला भाग डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याने चांगली कमाई केली होती. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाबद्दलची चर्चा वाढली असून त्यातील अॅक्शन आणि कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.







