जागतिक कांदळवन दिनानिमित्त आज भाईंदर (पूर्व) येथील जैसल पार्क खाडी परिसरात फॉर फ्यूचर इंडिया, मँग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कांदळवन स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.
या अभियानामध्ये १०० हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे ७५० किलोहून अधिक कचरा कांदळवनातून बाहेर काढला. या उपक्रमात पाटकर कॉलेज एनएसएस युनिट, एलआरएमसी कॉलेज एनएसएस युनिट, रॉयल कॉलेज एनएसएस युनिट, तसेच शहरातील अनेक विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, युवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागानेही या अभियानात सहकार्य केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना कांदळवनांचे पर्यावरणीय, जैवविविधता, हवामान बदल नियंत्रण तसेच किनारपट्टी संरक्षणातील राष्ट्रीय व जागतिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण परिसर स्वच्छ करून कांदळवन संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
हे ही वाचा:
रशिया-युक्रेन संघर्ष पुन्हा भडकला
एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..
AI मुळे टेक क्षेत्रात नोकऱ्यांवर घाला
स्वच्छता अभियानानंतर उपस्थित पर्यावरणप्रेमी युवकांनी पर्यावरणीय गुन्ह्यांच्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. विशेषतः मिरा-भाईंदर परिसरातील कांदळवन नाश प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या FIR व आरोपपत्रांमधील कथित प्रक्रियात्मक त्रुटी, तपासातील विसंगती आणि मुख्य आरोपींना वगळल्याच्या आरोपांमुळे युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
युवकांनी निदर्शनास आणून दिले की, काही प्रकरणांमध्ये मुख्य आरोपींना वगळून इतर व्यक्तींवर जबाबदारी टाकल्याचा संशय निर्माण होतो, तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले आहे का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्यानुसार तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी सांगितले की, भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशन आणि नवघर पोलीस स्टेशन येथील पर्यावरणीय गुन्ह्यांशी संबंधित दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये तपासातील अनेक विसंगती प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला असून, यासंदर्भात एसीपी, डीसीपी, अतिरिक्त आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी देऊनही अद्याप समाधानकारक कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
उपस्थित युवकांनी स्पष्ट केले की, हा उपक्रम पोलिसांविरोधातील आंदोलन नसून, पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास अधिक निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावा यासाठी केलेले शांततापूर्ण आवाहन आहे. पर्यावरणीय गुन्ह्यांमध्ये कोणालाही अभय मिळू नये, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि तपास प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कायम राहावा, हीच या उपक्रमामागील भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छता अभियानानंतर युवकांनी हातात विविध जनजागृतीपर फलक घेऊन पोलिसांना शांततापूर्ण पद्धतीने साकडे घातले. “निष्पक्ष तपास करा, पर्यावरणाला न्याय द्या”, “पोलीस जागे व्हा, पर्यावरण वाचवा”, “पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास पारदर्शक करा”, “कांदळवन तोडणाऱ्यांवर कारवाई करा, पर्यावरणाला न्याय द्या” अशा घोषणांद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी जबाबदार यंत्रणांनी अधिक उत्तरदायित्वाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
विशेष म्हणजे, मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या सन २००५ मधील कांदळवन संरक्षणासंदर्भातील ऐतिहासिक आदेशानंतर मिरा-भाईंदर शहरात पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत २०० हून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पर्यावरणीय गुन्ह्यांविरोधात सातत्याने कारवाई होणाऱ्या राज्यातील मोजक्या शहरांपैकी मिरा-भाईंदर हे एक जागरूक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, तपासातील कथित त्रुटी, प्रक्रियात्मक चुका आणि निष्पक्षतेबाबत निर्माण होणारे प्रश्न यामुळे पर्यावरणीय गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा होण्याची प्रक्रिया कमकुवत होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या नागरिक व स्वयंसेवकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याचा धोका निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांची लवकरच प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण प्रकरण मांडण्यात येणार असून, पर्यावरणीय गुन्ह्यांमधील तपास प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याची आणि सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शेवटी, आयोजकांनी स्पष्ट केले की, पोलिसांवर टीका करणे हा या उपक्रमाचा उद्देश नाही. उलट, पर्यावरणीय गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा मिळावी, तपासावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा आणि पोलीस प्रशासनाची विश्वासार्हता अधिक मजबूत व्हावी, यासाठीच हे लोकशाही मार्गाने केलेले शांततापूर्ण आवाहन आहे.







