श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी यांच्या मूर्तींवर रासायनिक लेपन (केमिकल कोटिंग) करण्याचा निर्णय जाहीर केल्याने राज्यभरातील वारकरी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मंदिर संरक्षणासाठी कार्यरत संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मंदिर महासंघाने या प्रक्रियेला विरोध दर्शवत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पंढरपुरात महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून मूर्तींवर रासायनिक लेपन करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि परंपरागत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मंदिर महासंघासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली असून याविरोधात एकत्रित भूमिका मांडण्याची तयारी सुरू केली आहे.
याच अनुषंगाने बुधवार, १७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता पंढरपूर येथील महाद्वार परिसरातील हिंदू महासंघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, वारकरी परंपरेतील ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर, गणेश लोंढे यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवरील रासायनिक लेपनाच्या निर्णयाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि परंपरागत परिणाम, मंदिर महासंघाची भूमिका तसेच पुढील आंदोलनाची दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषयाकडे राज्यातील लाखो वारकरी आणि विठ्ठलभक्तांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
जून २०२२ ची पुनरावृत्ती होणार? ठाकरे गटाचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर
विवान कारुळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक भवनाची भेट
घोडबंदरला वीर चिमाजी आप्पा यांचे नाव द्या!
जसपाल राणाच्या मृत्यूनंतर आईनेही प्राण त्यागले
महाराष्ट्र मंदिर महासंघाने राज्यातील सर्व वृत्तमाध्यमांना या पत्रकार परिषदेचे वृत्तांकन करण्याचे आवाहन केले असून, या विषयावर व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचेही नमूद केले आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तींवरील प्रस्तावित रासायनिक लेपनाचा मुद्दा आता राज्यभर चर्चेचा विषय बनला असून, उद्याच्या पत्रकार परिषदेत या वादग्रस्त निर्णयाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







