पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊस मध्ये पॅराग्वेचे राष्ट्रपती सैंटियागो पेना पालासिओस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी दोन्ही देशांनी आपसी संबंध मजबूत करण्यासोबतच विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी पॅराग्वेचे राष्ट्रपती सैंटियागो पेना पालासिओस यांच्याशी बोलताना सांगितले की, “दोन्ही देश दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र उभे आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपली यात्रा अत्यंत ऐतिहासिक आहे. पॅराग्वेच्या कोणत्याही राष्ट्रपतीची ही दुसरी भारत यात्रा आहे. मला आनंद आहे की आपल्यासोबत एक शक्तिशाली प्रतिनिधी मंडळ आले आहे. आपली फक्त दिल्लीच नाही तर मुंबईमध्येही भेट होणार आहे, यामुळे आपल्यातील संबंध मजबूत करण्याची आपली प्रतिबद्धता स्पष्टपणे दिसून येते. मला विश्वास आहे की आपसी सहकार्याने आम्ही सामूहिक समृद्धीकडे वाटचाल करू. आपल्याकडे आर्थिक सहकार्य, डिजिटल तंत्रज्ञान, महत्त्वाचे खनिज, ऊर्जा, कृषी, आरोग्य, संरक्षण, रेल्वे आणि अंतराळ यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या नव्या संधी आहेत.
पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले, “भारत आणि पॅराग्वे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र उभे आहेत. सायबर क्राईम, संघटित गुन्हे आणि मादक पदार्थांच्या तस्करीसारख्या सामान्य आव्हानांशी लढण्यासाठी सहकार्य करण्याच्या अपार संधी आहेत. भारत आणि पॅराग्वे ग्लोबल साउथचे अभिन्न भाग आहेत. आमच्या आशा, आकांक्ष आणि आव्हानांमध्ये समानता आहे, म्हणूनच आपण एकमेकांच्या अनुभवांकडून शिकून या आव्हानांशी प्रभावीपणे सामना करू शकतो.
आम्हाला आनंद आहे की कोविड महामारीच्या वेळी आम्ही भारतात बनवलेली लस पॅराग्वेच्या लोकांसोबत सामायिक करण्यात सक्षम होतो. अशा इतर क्षमताही आम्ही एकमेकांसोबत सामायिक करू शकतो. मला विश्वास आहे की आपल्या या भेटीद्वारे आपसी संबंध, विश्वास, व्यापार आणि घनिष्ठ सहकार्याचे नवीन स्तंभ मजबूत होतील. यामुळे भारत-लॅटिन अमेरिका संबंधांना नवे आयाम मिळतील. गेल्या वर्षी, मी गयाना येथे कॅरिकॉम शिखर परिषदेत भाग घेतला होता, जिथे आम्ही विविध विषयांवर सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली होती. या सर्व क्षेत्रांमध्ये पॅराग्वे आणि लॅटिन अमेरिकेतील इतर देशांसोबत आम्ही सहकार्य करू शकतो.
