मुंबई पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या घरांच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत पोलिसांसाठी एकूण ४५ हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असून, त्यापैकी ४० हजार घरे अंमलदारांसाठी आणि ५ हजार घरे अधिकाऱ्यांसाठी असतील. या प्रकल्पासाठी गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित करण्यात आली आहे.
सध्या मुंबई पोलिस दलात ५१,३०८ कर्मचारी असून, त्यापैकी फक्त १९,७६२ जणांनाच सरकारी घरे उपलब्ध आहेत. अनेक निवासस्थाने छोटी असल्याने पोलिसांचा कल त्याकडे नसल्याने १,६०१ घरे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीच्या शिफारशीनंतर मुंबईतील सुमारे ७५ भूखंडांवर पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प राबवला जाणार आहे.
या समितीत गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अध्यक्ष असून, सदस्य म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, तसेच सार्वजनिक बांधकाम, वित्त आणि नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकारी सामील आहेत.
हे ही वाचा :
हिंद महासागरात भारत दुबई निर्माण करतोय…
गँगस्टर डी.के. रावसह तिघांना खंडणी प्रकरणी अटक
इराणवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेकडून नऊ भारतीय कंपन्यांवर निर्बंध! प्रकरण काय?
आदिवासी गल्लीपासून एशियन गोल्डपर्यंत
मुंबई पोलिस दलाची स्थापना १८५६ मध्ये झाली असून, तेव्हापासून पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न कायम आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि बदलत्या परिस्थितीमुळे दलाची संख्या वाढली आहे. सध्या अनेक पोलिस कर्मचारी कर्जत, कसारा, रायगड, पालघर आदी ठिकाणांहून दररोज ८० ते १०० किमी प्रवास करतात, ज्याचा त्यांच्या मनोबलावर परिणाम होतो. या नव्या प्रकल्पामुळे पोलिसांना मुंबईतच सुलभ निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.







