काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील दंडाधिकारी न्यायालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी पोहोचले होते. भिवंडी दंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधी यांना या प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यास सांगितले होते कारण त्यांचे जामीनदार माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निधन झाले होते. राहुल गांधी यांनी या प्रकरणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख हर्षवर्धन सपकाळ यांना नवीन जामीनदार म्हणून सादर केले.
सुनावणीनंतर राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर म्हणाले की, “राहुल गांधींना जामीन देणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे नवीन जामीन सादर करणे आवश्यक होते. आता, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी जामीन सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा खटला जलदगतीने चालवला जाईल. या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल; आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे.”
राहुल गांधी यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वीही अनेक वेळा त्यांच्या विविध विधानांबद्दल माफी मागितली आहे. राहुल गांधी यावेळी पुन्हा माफी मागतील आणि प्रकरण मिटवतील का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींच्या वकिलांनी उत्तर दिले की, “माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्हाला फक्त जामीन मिळवायचा होता. आम्हाला नवीन जमीन पुरवावा लागला. पुढील सुनावणी मार्चमध्ये होईल. आम्ही न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढे जात आहोत.”
हे ही वाचा:
आरोग्य योजनेंतर्गत बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक; सात जणांच्या टोळीला अटक
ट्रम्प यांच्या टॅरिफविरुद्ध युक्तिवाद करणारे भारतीय वंशाचे वकील; कोण आहेत नील कात्याल?
लाल किल्ला परिसरावर लष्कर-ए-तैयबाचे लक्ष्य?
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भारतावर काय होणार परिणाम?
प्रकरण काय?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाळे गावात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचे म्हटले होते, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी न्यायालयात केला. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (बदनामी) अंतर्गत त्यांनी केलेल्या तक्रारीत कुंटे यांनी म्हटले आहे की या खोट्या टिप्पणीमुळे आरएसएसची प्रतिमा मलिन झाली आहे. खटल्यादरम्यान कुंटे यांची उलटतपासणी घेण्यात आली आहे. पुढील सुनावणी मूळतः २० डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, परंतु नवीन जामीनदाराची आवश्यकता असल्याने ती १७ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. १७ जानेवारी रोजी दंडाधिकाऱ्यांनी सुनावणीची तारीख २१ फेब्रुवारीपर्यंत वाढवली.







