राज्यात ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मुंबईतील किमान सरासरी तापमान २३.८ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग अधिक असल्यानं मच्छिमारांना आज आणि उद्या समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हे ही वाचा:
खर्च ३ हजार कोटी पण पालिकेच्या मराठी शाळांत मुले ३५ हजार
आयपीएल २०२२ च्या हंगामात ‘हे’ खेळाडू खेळणार त्यांच्याच संघातून
पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू
हवामान विभागाकडून राज्यभरात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पालघर, धुळे, नाशिक, नंदुरबारसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यभरातील विविध भागात दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस अनुभवायला मिळणार आहे.
मागील महिन्यात दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशाला वादळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. पूरपरिस्थितीमुळे जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली.







