अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने आता देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. २२ जानेवारीला हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. भारतातच नव्हे तर विदेशातही या सोहळ्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे आणि त्या दिवसाचे औचित्य साधून तेथील भारतीय आपापल्या पद्धतीने रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.
कारुळकर प्रतिष्ठाननेही प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या उत्साहात आपला हातभार लावला आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राममंदिराची स्फटिकाची प्रतिकृती त्यांनी अनिवासी भारतीय वसंत नाईक यांना पाठवली आहे. कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्यालयात या प्रतिकृतीचे विधिवत पूजन करून ती न्यू जर्सीला रवाना करण्यात आली आहे. तिथेही या प्रतिकृतीचे पूजन करण्यात येणार आहे.
मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर, प्रशांत कारुळकर यांच्या सुविद्य पत्नी तसेच कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर, त्यांचे सुपुत्र विवान कारुळकर यांनी राम मंदिराच्या प्रतिकृतीची विधिवत पूजा केली. त्यानंतर ही प्रतिकृती न्यू जर्सी येथे स्थित अनिवासी भारतीय वसंत नाईक यांना पाठविण्यात आली आहे.
हे ही वाचा:
तेलंगणात अदानी समूहाकडून साडेबारा हजार कोटींची गुंतवणूक होणार
शेअर बाजाराच्या निर्देशांकात लक्षणीय घट
ज्यांच्यामुळे नेते सोडून गेले, त्यांच्याच हातून आज पक्ष निसटला!
मणिपूर: सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये चकमक, जवान हुतात्मा!
या प्रतिकृतीच्या आगमनानंतर २१ जानेवारी तसेच २२ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे एडिसन, न्यू जर्सी येथे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमात सत्यनारायण पूजा, हवन-पूजन, अभिषेक, तीर्थ प्रसाद, भजन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यानंतर प्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे. त्याचवेळी राममंदिर उद्घाटनाचे औचित्य साधून कार रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे.
वसंत नाईक यांनीही यासंदर्भात प्रशांत कारुळकर आणि शीतल कारुळकर यांचे आभार मानले आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने राममंदिराची प्रतिकृती पाठवल्याबद्दल त्यांनी हे आभार व्यक्त केले आहेत.
सध्या अयोध्येतील या सोहळ्यामुळे जगभरात उत्साहाचे वातावरण दिसते आहे. अमेरिकतेही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिथे मोठ्या स्क्रीनवरही हा सोहळा दाखविण्यात येणार आहे. काहीठिकाणी मिरवणुका, पालख्याही निघणार आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्येही राम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.