‘अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य सरकार बेदरकारपणे वाहन चालवण्याचे विविध गुन्हे अजामीनपात्र गुन्ह्यांच्या कक्षेत आणणार आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार मद्यपान करून वाहन चालवणे, अतिवेगाने आणि बेपर्वा किंवा बेदरकार वाहन चालवणे, हे सर्व गुन्हे सध्या मोटार वाहन कायद्यांतर्गत जामीनपात्र आहेत. मात्र बेदरकारपणे वाहन चालवताना किंवा दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्यास गुन्हा अजामीनपात्र करण्याच्या प्रस्तावावर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
हिमाचल प्रदेशमध्ये बेदरकार वाहने चालवणे हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात आला आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्रानेही तयार करावा आणि मंजुरीसाठी केंद्र सरकारला पाठवावा, असे निर्देश शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सन २०२१मध्ये महाराष्ट्रात रस्ते अपघातांत १३ हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला होता. तर, २०२२मध्ये ही संख्या १४ हजार ८८४ वर पोहोचली आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२३मध्ये मात्र अपघातांची संख्या २०२२च्या तुलनेत १८ टक्क्यांनी कमी झाली आहे. चालकांच्या निष्काळजीमुळे निष्पापांचे बळी जातात. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे शिंदे यांचे मत आहे.
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्रिपद ही वडिलोपार्जित मालमत्ता नाही’
चोराला झाला पश्चात्ताप; तब्बल नऊ वर्षांपूर्वी चोरलेले दागिने केले परत
दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचे उद्धव ठाकरेंचे स्वप्न आजही जिवंत
अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार
एका सर्वेक्षणानुसार, २०२२मध्ये झालेल्या अपघातांत ठार झालेल्यांपैकी ४४ टक्के जण हे पादचारी होते. तर, पाच टक्के दुचाकीचालक व १० टक्के गाडीमधील प्रवासी होते. नियमभंग करणाऱ्या चालकांकडून दंडवसुलीत येणारे अपयश हा प्रश्नही राज्याच्या वाहतूक पोलिसांना भेडसावतो आहे.
आतापर्यंत लोक अदालतीच्या माध्यमातून सन २०२२मध्ये २०० कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र चलान दिल्यानंतर दंड वसूल करण्यासाठी योग्य यंत्रणेची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शिंदे यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या महामार्गांवर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढू लागली असून पोलिसांकडून याबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जात आहे.