भारताने अफगाणिस्तानविरोधातील तीन टी२० सामन्यांची मालिका ३-० अशी खिशात टाकली. भारतीय संघाने बुधवारी बेंगळुरूच्या के. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अफगाणिस्तानच्या संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. रोहित शर्मा याने शानदार शतक ठोकून अनेक विक्रम रचले. तसेच, कर्णधार म्हणून त्यांनी मोठे यशही मिळवले. रोहित हा टी-२०मध्ये संयुक्त रूपात भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा ५४वा सामना होता. त्यांनी ४२ वा विजय प्राप्त केला. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालीसुद्धा भारतीय संघाने ४२ सामने जिंकले आहेत. रोहित शर्मा याला महेंद्र सिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी अफगाणिस्तानविरोधातील तीनही सामने जिंकणे अनिवार्य होते आणि असेच झाले. रोहित जर टी २० विश्वचषक स्पर्धेत कर्णधार होईल, तर त्याला धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
सामन्यात झाले काय?
भारतीय कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांत चार विकेट गमावून २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्ताननेही २० षटकांत सहा विकेट गमावून २१२ धावा केल्या. त्यानंतर सामना सुपरओव्हरमध्ये पोहोचला. भारतीय संघाला पहिल्यांदाच एका सामन्यात दोन सुपरओव्हर खेळाव्या लागल्या.
हे ही वाचा:
हुती गटाच्या हल्ल्याला अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर!
पाकिस्तानचा पलटवार; इराणवर एअर स्ट्राईक
धावपट्टी परिसरात प्रवाशांची पंगत; इंडिगोला एक कोटी २० लाखांचा तर, मुंबई विमानतळाला ९० लाखांचा दंड!
पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…
पहिल्या सुपरओव्हरमध्ये अफगाणिस्तानने १६ धावा केल्या. भारताला १७ धावा करायच्या होत्या. मात्र रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंह मिळून १६ धावाच करू शकल्या. त्यानंतर दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करून ११ धावा केल्या. यावेळी रोहित आणि रिंकूसह संजू सॅमसन याने फलंदाजी केली. अफगाणिस्तानसमोर १२ धावांचे लक्ष्य होते. मात्र त्यांचा संघ अवघी एक धाव करू शकला. रवी बिश्नोईने दोन विकेट घेऊन संघाला विजय मिळवून दिला.